पुणे : रिक्षा चोरटे गजाआड; विविध भागांतून चोरीस गेलेली सहा वाहने जप्त | पुढारी

पुणे : रिक्षा चोरटे गजाआड; विविध भागांतून चोरीस गेलेली सहा वाहने जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या वेगवेगळ्या भागातून रिक्षा चोरी करणार्‍या चोरट्यांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या. शादाब युसूफ अन्सारी (वय 21), अखिल हमीद चौधरी (वय 38, दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खडकी, दत्तवाडी, कात्रज, कोंढवा भागातून तीनआसनी रिक्षा चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या युनिट तीनकडून तपास करण्यात येत होता. रिक्षा चोरटे औंध परिसरात थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते, सतीश कत्राळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले.

दोघांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून सहा रिक्षा लांबविल्याची माहिती तपासात उघड झाली. चोरट्यांकडून सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. दोघांना खडकी न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, संतोष क्षीरसागर, रामदास गोणते आदींनी ही कारवाई केली.

तरुणाचा मोबाइल हिसकावला
कोंढवा भागात पादचारी तरुणाचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत अब्दुल कादीर सलामत (वय 24, रा. मार्केट यार्ड) याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलामत कोंढवा परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीवरील चोरट्यांनी त्याच्या हातातील 18 हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. सहायक पोलिस निरीक्षक तोरनाळ तपास करीत आहेत.

 

Back to top button