पुणे : सहकारी साखर कारखान्यांना क्रेडिटनुसार व्याजदर | पुढारी

पुणे : सहकारी साखर कारखान्यांना क्रेडिटनुसार व्याजदर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्पर्धात्मक युगात व्याजदर हा साखर कारखान्यांच्या उत्पन्नातील एक महत्त्वाचा घटक ठरू पाहतो आहे. त्यामुळे राज्य बँकेशी निगडित सहकारी साखर कारखान्यांना त्यांची पत पाहून कमीत कमी व्याजदरात जास्तीत जास्त कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मानांकनाचा (रेटिंग मॉडेल) मसुदा नुकताच मंजूर केला आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँकेने राज्य सहकारी साखर संघाच्या सहकार्याने अंमलबजावणी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

शिस्त, व्यवसायाची पध्दत, प्रशासन, आर्थिक बाबी व व्यवसायातील प्रगती या 5 विभागांतील कामगिरीचे वर्गीकरण करून कारखान्यांना अ, ब, क व ड या 4 वर्गांमध्ये वर्गीकृत केले गेले आहे. यामध्ये रेटिंग मॉडेलनुसार, 80 च्या वर गुण मिळालेल्या कारखान्यांना अ वर्ग, 65 ते 80 गुण मिळालेल्या कारखान्यांना ब, 50 ते 65 गुण मिळालेल्या कारखान्यांना क वर्ग व 50 च्या खाली गुण मिळालेल्या कारखान्यांना ड वर्गात वर्गीकृत केले गेले आहे.

कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कारखान्याने सादर केलेल्या ऑडिटेड ताळेबंदावरून त्याचे रेटिंग ठरविण्यात येईल. त्यानुसार कमीत कमी 9 टक्के व जास्तीत जास्त 11.50 टक्के इतका व्याजदर त्यांना दिलेल्या कर्ज सवलतीवर आकारण्यात येईल. दरवर्षी 31 मार्चच्या आर्थिक निकषांवर सदर रेटिंग करण्यात येईल. सन 2022-23 या आर्थिक वर्षापासून रेटिंग मॉडेलची अंमलबजावणी करण्याचा धोरणात्मक निर्णयही बँकेने घेतला आहे.

मापदंडामध्ये पात्रतेइतपत गुण मिळवू न शकल्यास हे कारखाने रेटिंग मॉडेलनुसार संबंधित सवलतीस अपात्र राहतील. निश्चित झालेला व्याजदर एक वर्षासाठी लागू राहील व पुन्हा एकदा 31 मार्चच्या आर्थिक स्थितीवर पुढील आर्थिक वर्षाकरिता रेटिंग निश्चित केले जाईल. कारखान्यांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून राज्य बँकेने तयार केलेल्या या धोरणाचे राज्य साखर महासंघाने तसेच साखर क्षेत्राने स्वागत केले आहे. आपले गुण वाढविण्याबाबत व व्याजदरात जास्तीत जास्त सवलत घेण्याबाबत साखर कारखानास्तरावर नियोजन केले जाईल, अशी राज्य बँकेची अपेक्षा असल्याचे अनास्कर म्हणाले.

Back to top button