

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : वडगाव शहरातील काही दिवसांपासून रखडलेल्या मुख्य रस्त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली असून, बाजारपेठेतील हा रस्ता 10 मीटर रुंदीचा होणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंची अतिक्रमणे काढून काम सुरू करण्यात आले आहे. मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराच्या बाजारपेठेतील मुख्य रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने आमदार सुनील शेळके यांनी हा रस्ता रुंद करून पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्यासाठी सुमारे 7 कोटींचा निधी मंजूर करून घेतला व प्रत्यक्ष कामही सुरू झाले. शहराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारापासून शिवाजी चौकापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये शिवाजी चौकापर्यंत 10 मीटर काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूंना प्रत्येकी 1 मीटर रुंदीचे पेव्हिंग ब्लॉक व त्याखाली भूमिगत ड्रेनेज, पाण्याची लाईन, विद्युत लाईन टाकण्यात आली आहे. शिवाजी चौकापासून पुढील काम जवळपास तीन महिन्यांपासून रखडले आहे.
दरम्यान, शिवाजी चौकापासून न्यायालयाच्या इमारतीपर्यंत अरुंद रस्ता व दोन्ही बाजूंना अतिक्रमणे असल्याने तसेच काही नागरिकांचा अतिक्रमण काढण्यास विरोध झाल्याने पुढील काम रखडले होते. आमदार शेळके यांनी मात्र हा रस्ता वडगाव शहराच्या व बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने किमान 10 मीटर रुंद व्हावा, यासाठी प्रयत्न केले.
यासंदर्भात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आढावा बैठकीत निर्णय घेऊन 8 मीटर रुंद काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक मीटर रुंदीचे पेव्हिंग ब्लॉक असा 10 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला व तात्काळ कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. गणपती मंदिरासमोरील चौकापासून चावडी चौकापर्यंत दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असून भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वडगाव शहरातील मुख्य रस्ता हा वर्दळीच्या दृष्टीने व बाजारपेठेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्याने तो रुंद व प्रशस्त होणे आवश्यक आहे. रस्ता रुंद झाल्यास बाजारपेठेतही भव्यता येईल, पुढील 50 वर्षांची दूरदृष्टी ठरवून या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य आवश्यक आहे.
-सुनील शेळके, आमदार