वाल्हे : 25 वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद तंटामुक्ती समितीने मिटविला | पुढारी

वाल्हे : 25 वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद तंटामुक्ती समितीने मिटविला

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा : वाल्हे (ता. पुरंदर) येथील वाल्हे – मांडकी – हरणी मार्गाजवळील चाहूरवस्ती येथील मागील सुमारे पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद तंटामुक्ती गाव समितीच्या माध्यमातून नुकताच मिटला आहे. लगेचच या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या वस्तीमधील नागरिकांची रस्त्याअभावी होणारी ससेहोलपट यामुळे अखेर थांबणार आहे.

फक्त तीनशे ते चारशे मीटर रस्त्यासाठी तब्बल तीन किलोमीटरचा डोंगरमाळरानातून, पावसाळ्यात पाण्याच्या डबक्यातून, चिखल तुडवत व पाऊस उघडल्यानंतर दोन- तीन फूट उंच गवतातून वळसा मारून जावे लागत होते. रस्त्याच्या वादासंदर्भात अनेक वर्षांपासून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.

वाद छोटाच होता, मात्र त्याचे खूप मोठे परिणाम येथील नागरिकांसह येणार्‍या नातेवाईक, मित्र परिवार या सर्वांना सोसावे लागत होते.
गावातील तंटामुक्ती समिती, ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायतीने यामध्ये सामंजस्याने चर्चा घडवून आणत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले व दोन्हींकडील नागरिकांनी सामाजिकतेचे भान राखत व वस्तीतील सर्वांच्याच अडचणींचा विचार करून या तीनशे मीटर रस्त्याच्या वादाला तिलांजली देत वाद संपुष्टात आणला.

ग्रामपंचायतीच्य वतीने या ठिकाणी जवळपास पंधरा लाख रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन वस्तीतील ग्रामस्थ अशोक नारायण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले असून, मंगळवारी (दि.15) प्रत्यक्षात या रस्त्यांच्या कामासही सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी सरपंच अमोल खवले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष समदास भुजबळ, उपसरपंच विजयसिंह पवार, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, समदास राऊत, पोपट नवले, भगवान राऊत, सुहास राऊत, शिरीष नवले, सागर भुजबळ, अनिल भुजबळ, राजेंद्र गायकवाड, शोधन नवले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी तंटामुक्ती अभियान राबविल्याने अनेक गावांतील वाद- विवाद संपुष्टात आले. प्रशासनाने जरी आता तंटामुक्तीचा कार्यक्रम जवळपास गुंडाळलेला असला, तरी वाल्हे येथे तंटामुक्ती समितीच्या बैठकीमध्ये वाद-विवाद संपुष्टात येऊन वस्तीचा रस्ता खुला झाल्याने ग्रामीण भागातील वाद-विवादावर अजूनही तंटामुक्तीची छाप असल्याचे अधोरेखित झाले आहे.

Back to top button