पुणे : कोरोनानंतर टेलिमेडिसीनला ‘अच्छे दिन’ तीन वर्षांत दुप्पट उलाढाल | पुढारी

पुणे : कोरोनानंतर टेलिमेडिसीनला ‘अच्छे दिन’ तीन वर्षांत दुप्पट उलाढाल

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रयत्न ‘टेलिमेडिसीन’च्या माध्यमातून केला जात आहे. कोरोना महामारीच्या काळात टेलिमेडिसीन सुविधेच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली. ‘फॉर्च्युन बिझनेस इनसाईट’ मधील अहवालानुसार 2019 च्या तुलनेत 2022 मध्ये देशात टेलिमेडिसीन उद्योगातील उलाढालीत दुपटीने वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैद्यकीय उपचार, इतर शहरांच्या तुलनेत स्वस्त उपचारपध्दती, निष्णात डॉक्टर, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अशा विविध कारणांंमुळे पुणे ‘मेडिकल टुरिझम’ म्हणून उदयास आले आहे. मेडिकल टुरिझमला टेलिमेडिसीन सुविधेचा आधार मिळाला आहे. ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅप कॉल, चॅट आदींच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून डॉक्टर आणि रुग्ण यांना एकमेकांशी संवाद साधणे शक्य झाले आहे.

टेलिमेडिसीन सुविधेला आणखी बळकटी देण्यासाठी 24 बाय 7 सेटअप, रिअल टाइम डेटा आणि विश्लेषणातील अचूकता, तंत्रज्ञानाचे प्रभावी नेटवर्क, डिजिटल हेल्थकेअर्स टूलचा वापर, डिजिटल हेल्थकेअर इन्फ—ास्ट्रक्चर आदींवर भर देण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अमोल मेहता यांनी सांगितले.

आयुष्मान भारत योजनेतून तालुका आरोग्य केंद्रांमध्ये आता टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ई-संजीवनी’ या टेलिमेडिसीन योजनेअंतर्गत गेल्या 10 महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील 26 हजारांहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी टेलिमेडिसीन सेवा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 68 डॉक्टरांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.

महापालिकेतर्फे मिळणार सल्ला
शहरात महापालिकेच्या 54 रुग्णालयांमधील रुग्णांना टेलिमेडिसीनच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार मिळू शकणार आहेत. त्यासाठी कमला नेहरू रुग्णालयात यासाठी ‘डॉक्टर हब’ तयार केले जात आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, गर्भवती मातांच्या आरोग्याच्या समस्या, लहान मुलांचे आजार, यासाठी ‘डॉक्टर हब’ च्या माध्यमातून ऑनलाइन सल्ला मिळणार आहे.

कोणत्या आजारांसाठी टेलिमेडिसीन उपचार शक्य?

  • मधुमेह
  • उच्च रक्तदाब
  • मानसिक आजार
  • संसर्गजन्य आजार
  • हाडांचे आजार
  • डाएटिंग

कोणासाठी उपयुक्त?

  • अंथरुणाला खिळलेले रुग्ण श्र संसर्गजन्य आजारांचे रुग्ण
  • ज्येष्ठ नागरिक

कोरोना काळापासून नॅशनल मेडिकल कमिशनतर्फे टेलिमेडिसीन उपचारांना परवानगी मिळाली आहे. प्रत्यक्ष भेटीद्वारे प्राथमिक तपासणी केल्यानंतर रुग्णांचे फॉलोअप, सल्ला, समुपदेशन, शंका निरसन टेलिमेडिसीनच्या माध्यमातून करण्यावर भर दिला जातो. परदेशातील अनेक रुग्ण विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी पुण्यात येतात. शस्त्रक्रियेनंतर पुढील उपचार टेलिमेडिसीनच्या माध्यमातून देता येतात.

                                         डॉ.संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया

आजकाल ग्रामीण भागातही मोबाईलच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. ग्रामीण भागात मोबाईल सहज उपलब्ध आहेत, मात्र डॉक्टर नाहीत. अशा परिस्थितीत टेलिमेडिसीनचा खूप उपयोग होतो. रक्तदाब, साखरेची पातळी अशा तपासण्या घरच्या घरी करणे शक्य होते. अनेक लॅब तपासण्यांसाठी घरपोच सुविधा देतात. तपासण्यांचे रिपोर्ट डॉक्टरांना मेलवर, व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले जातात.

                                                            – डॉ. सम्राट शहा, जनरल फिजिशिअन

Back to top button