पुणे : सहा महिन्यांत महावितरणला साडेबावीस कोटींचा झटका | पुढारी

पुणे : सहा महिन्यांत महावितरणला साडेबावीस कोटींचा झटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वीजचोरीसह विनापरवाना वीजजोड घेऊन वापर करणार्‍यांविरोधात महावितरणने आता कंबर कसली असून, अशा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश महावितरणच्या प्रादेशिक विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागात 6 महिन्यांत केलेल्या 47 हजार 563 वीजजोडण्यांच्या तपासणीत 5 हजार 719 प्रकरणे वीजचोरी आणि 1 हजार 591 प्रकरणे अनधिकृत वीजवापराची आढळली आहेत.

यामध्ये महावितरणचे तब्बल 22 कोटी 50 लाखांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. वीजचोरी करणार्‍यांविरोधात कारवाईची मोहीम राबविण्याचे आदेश प्रादेशिक संचालक (प्रभारी) अंकुश नाळे यांनी दिले. त्यानुसार या वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 47 हजार 563 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. त्यात वीजचोरीद्वारे 16 कोटी 7 लाख रुपयांचा आणि अनधिकृत वीजवापराद्वारे 6 कोटी 43 लाख रुपयांचा महसूल बुडत असल्याचे निदर्शनास आले.

Back to top button