नेहरूंच्या चुकांचीच यादी योग्य आहे का? नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष चपळगावकर यांचा सवाल | पुढारी

नेहरूंच्या चुकांचीच यादी योग्य आहे का? नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष चपळगावकर यांचा सवाल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंडित जवाहरलाल नेहरू यांचा देशहिताचा दृष्टिकोन आणि त्यांनी देशासाठी केलेले कार्य बाजूला सारून केवळ त्यांच्या चुकांची यादी तयार केली जाते, ते योग्य आहे का, असा सवाल नेहरूंवर टीका करणार्‍यांना माजी न्यायमूर्ती आणि नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांनी सोमवारी विचारला.

पुणे इंटरनॅशनल सेंटर व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पुणे संवाद व्याख्यानमालेंतर्गत आयोजित ’नेहरू – विचार मंथन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर यांनीही विचार मांडले. अ‍ॅड. राज कुलकर्णी व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे अजित रानडे उपस्थित होते.

म्हणाले, की अपुरी, चुकीची आणि खोटी माहिती हे इतिहासाचे तीन शत्रू आहेत. ते तिन्ही शत्रू जेव्हा इतिहासाला डागाळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा इतिहास जाणून घेणार्‍यांना अधिक सजग राहण्याची गरज असते. नेहरू यांनी चुका केल्या नाहीत, असे मी म्हणणार नाही. जाणत्या लोकांच्या हातून पण चुका होतात. सर्व पंतप्रधानांच्या हातूनही चुका होऊ शकतात. जो पुढाकार घेऊन काम करतो. त्यांच्या हातूनच चुका होतात.

इतिहास वाचला की भविष्यकाळातील धोके स्पष्ट दिसू लागतात, याकडे लक्ष वेधत चपळगावकर यांनी नेहरूंचे बालपण, गांधीजी आणि नेहरूंमधील मतभेद, नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे नाते, नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचा अपप्रचार, काश्मीर आणि चीन प्रश्नांवरून नेहरूंना सातत्याने केले जाणारे लक्ष्य यावर भाष्य केले.

ते म्हणाले, ’विज्ञाननिष्ठ भारत निर्माण व्हावा, असे नेहरूंना वाटत होते. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले असल्याने त्या परिस्थितीत नेहरूंनी देश चालविला. नेहरू हे देशात नव्हे, तर जगात ओळख असणारे नेते होते. नेहरूंनी ज्या ज्या वेळी देशवासीयांशी संवाद साधला तोआत्मसंवाद असायचा. त्यामुळे ते प्रचंड लोकप्रिय होते.’ लेखिका स्वाती राजे यांनी प्रास्ताविक केले.

Back to top button