रिकाम्या खुर्च्या अन् बंदिस्त खिडक्या! धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय | पुढारी

रिकाम्या खुर्च्या अन् बंदिस्त खिडक्या! धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

बाजीराव गायकवाड

धनकवडी : वेळ सकाळी पावणेदहाची… खुर्च्या अन् टेबल रिकामे… मळलेली फरशी व बंदिस्त खिडक्या… असे चित्र धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात दिसून आले. पुन्हा पंधरा मिनिटांनी पाहिले, तर परिस्थिती पूर्ववतच होती!. बोटावर मोजण्याइतके दोन-तीन कर्मचारी कार्यालयात होते. दहा वाजून गेले तरी क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सर्वसामान्यांसाठी खुले झालेले नव्हते.

सर्वसामान्यांसाठी प्रशासन सज्ज आहे, हा दावा या कार्यालयात हवेत विरत असल्याचे दिसून आले. कार्यालयाच्या कामकाजाची वेळ सकाळी पावणेदहा असली, तरी कामकाज प्रत्यक्षात साडेदहानंतर सुरू झाल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्तांनी मागील कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व कर्मचार्‍यांना नुकतेच दिले आहेत. मात्र, या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याकडे काणाडोळा करताना दिसत आहेत.

स्थापत्य विभागाचे काही कर्मचारी निवडणुकीचे काम करण्यासाठी गेले आहेत. करसंकलन करणारे कर्मचारी फिल्डवर जाऊन मिळकतकर धारकांची माहिती घेण्यासाठी गेले आहेत. तसेच, आरोग्य विभागाचे अधिकारीदेखील सकाळी फिल्डवर गेले असल्याचे सांगण्यात आले. आधार केंद्र चालवणारे दोन कर्मचारी उपस्थित होते. मात्र, आधारकार्ड काढणे व दुरुस्तीचे कामकाजाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सहायक आयुक्त मुख्य इमारतीकडे कार्यालयीन कामकाजासाठी गेलेले असल्यामुळे त्यादेखील
उपस्थित नव्हत्या.

आरोग्य विभागाचे निरीक्षक सकाळी फिल्डवर जातात. तसेच अभियंतेदेखील सकाळी फिल्डवर गेलेले असतात. आस्थापना विभाग आणि पीएफसी विभागातील कर्मचारी सकाळी दहाला येतात.
                                                                  -किशोरी शिंदे,
                             सहायक आयुक्त, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

Back to top button