पिंपरी : ‘आनंदाच्या शिधा’साठी दिवाळीनंतरही दमछाक | पुढारी

पिंपरी : ‘आनंदाच्या शिधा’साठी दिवाळीनंतरही दमछाक

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : राज्य शासनाने गरीब जनतेला दिवाळीची भेट म्हणून शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटपाची घोषणा केली; परंतु दिवाळी होऊन गेली तरी आनंदाचा शिधा पदरात पाडून घेण्यासाठी शहरातील पात्र रेशनिंग कार्ड धारकांची दमछाक झाली. शासनाने किराणा दुकानात अंदाजे साडेतीनशे रुपयांना मिळणारा किराणामाल स्वस्त धान्य दुकानामध्ये शंभर रुपयामध्ये देण्याची घोषणा केली.

प्रत्यक्षात दिवाळी होऊन गेली तरी शहरातील अनेक रेशनिंग दुकानांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध झाला नाही. ज्या दुकानांमध्ये शिधा आला तेथे सर्वर डाऊनच्या तक्रारींमुळे मोठ्या रांगा लागल्या. यावर उपाय म्हणून शासनाने ऑफलाइन शिधा वाटपाचे आदेश दिले. पण ते तोंडी असल्याने दुकानदारांनी पुढे अडचणीत यायला नको म्हणून ऑनलाइनचे धोरण स्वीकारले. त्यामुळे दिवाळीनंतरच्या आनंदाच्या शिधासाठीही लोकांची दमछाक झाली.

शहरातील अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील 1 लाख 28 हजार 476 रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.मात्र दिवाळी होऊन गेली तरी स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा उपलब्ध न झाल्याने लोकांची निराशा झाली. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त सवलतीच्या दरात 100 रु प्रति किट त्यामध्ये प्रत्येकी एक किलो साखर, चणाडाळ, पामतेल व रवा देण्याची घोषणा केली.

दरमहा मिळणारे नियमीत धान्य, प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्य या व्यतिरिक्त अतिरिक्त पॅकेज स्वस्त दरात गोरगरीब जनतेला उपलब्ध होणार असल्याने या दिवाळी किट कडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले मात्र दिवाळी होऊन गेली. आनंदाचा शिधा उपलब्ध न झाल्याने रेशन कार्ड धारकांना बाहेरून महागड्या दराने किराणा आणून दिवाळी करावी लागली.

दिवाळी उलटून चालली तरी रेशनिंग दुकानात किराणा माल उपलब्ध न झाल्याने लोकांमध्ये आक्रोश वाढला. तेव्हा राज्य मंत्रिमंडळातील मंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत असते तोपर्यंत शिधा नक्की उपलब्ध होईल असे सांगून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

लोकांनी आता शासनाचा आधार मिळणे अवघड असल्याचे लक्षात घेऊन प्रसंगी कर्ज काढून दिवाळी केली. शहरात साधारणपणे 31 ऑक्टोबरनंतर आनंदाचा शिधा दुकानांमध्ये उपलब्ध झाला. मात्र पॉस मशीनच्या साह्याने वाटप केले जात असल्याने व तीन वेळा थम्ब घ्यावा लागत असल्याने एका व्यक्तीला धान्य घेण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागत होती.

अनेक रेशनिंग दुकानांमध्ये रांगा लागल्या. सर्वर डाऊनची तक्रार लक्षात घेऊन शासनाने ऑफलाइन आनंदाचा शिधा वाटपाची घोषणा केली; मात्र याबाबतचे लेखी आदेश रेशनिंग दुकानदारांपर्यंत न पोहोचल्याने कोणतीही रिस्क नको म्हणून रेशनिंग दुकानदारांनी ऑनलाइन शिधावाटपासच पसंती दिली पर्यायाने दिवाळीनंतरच्या आनंदाच्या शिधासाठी ही नागरिकांची चांगलीच दमछाक झाली.

पिंपरी- चिंचवडमध्ये दिवाळी कीट जसजसे येतील तसे त्याचे वाटप केले गेले. आजही उपलब्ध आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे कोणीही लाभार्थी त्यापासून वंचित राहणार नाही.
                                         -दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी

स्वस्त धान्य दुकानदारांनी आनंदाचा शिधा किट साठी ऑर्डर दिली पैसे भरले तरीही वेळेत दिवाळी किट उपलब्ध झाले नाहीत त्यामुळे दुकानदार आणि रेशनिंग कार्ड धारकांमध्ये विनाकारण वादाचे प्रसंग आले. योजना चांगली होती पण आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती. मात्र केवळ दिवाळीतच गोरगरिबांची गरज नसून साखर, डाळ, पामतेल दरमहा रेशनिंग दुकानात उपलब्ध होण्याची गरज आहे
                                                             -विजय गुप्ता, नेते,
                                                         ऑल इंडिया शाप कीपर फेडरेशन

Back to top button