पिंपरी : वे टू भुर्रर्र…! पडेल महागात; पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा | पुढारी

पिंपरी : वे टू भुर्रर्र...! पडेल महागात; पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा

संतोष शिंदे
पिंपरी : अलीकडे काही हौशी मंडळी फिरायला जाताना सोशल मीडियावर ‘वे टू भुर्रर्र’ किंवा पोहचल्यानंतर लगेचच रिच्ड् गोवा, ‘एन्जोइंग इन कोकण’, अशा प्रकारचे संबंधित ठिकाणांची नावे टाकून स्टेटस, स्टोरी ठेवतात. मात्र, यामुळे शहरातील कुलूपबंद घर फोडण्यासाठी चोरट्यांना एक प्रकारे आमंत्रण मिळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नागरिकांना सोशल मीडियावर अपडेट देताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिवाळी सणानंतर शहरातील बहुतांश नागरिक घराला कुलूप लावून कोकण किंवा गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर फिरण्यासाठी जातात. त्यामुळे दिवाळीनंतरही काही दिवस शहरातील घरफोड्यांचा धडाका सुरूच राहतो. यातच अलीकडे काही वर्षांपासून सोशल मीडियावर दर तासाचे अपडेट देण्याचे एक नवीन फॅड सुरु झाले आहे.

ज्यामुळे चोरट्यांना आयते कुरण मिळू लागले आहे. पोलिसांना काही गुन्ह्यांच्या तपासात चोरटयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती घेऊन चोर्‍या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

जवळच्या व्यक्तींपासूनही धोका

यापूर्वी शहरात घडलेल्या चोरीच्या काही घटनांमध्ये जवळच्या नातेवाईकांनीच हात साफ केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आपल्या घरात कोणीच नाही, आपण कोठून कोठे जातोय, घरी कधी परतणार, याबाबत सोशल मीडिया सारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर वाच्यता करणे धोकादायक ठरू शकते.

मागील महिन्यात घरफोडीचे 31 गुन्हे दाखल
मागील महिन्यात 1 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यानच्या काळात घरफोडीचे 31 गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच शहर परिसरात चोरटयांनी 31 पेक्षा जास्त घरे फोडली आहेत. एकाच परिसरात फोडलेल्या घरांची एकत्रित नोंद घेतली जात असल्याने घरफोडीचा आकडा मोठा वाटत नाही. ऑक्टोबरमधील 31 गुन्ह्यांपैकी केवळ एक घरफोडी उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

प्रायव्हसी सेटिंगबाबत अनभिज्ञ
मोबाईलधारक सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. मात्र, व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा सारख्या प्रचलित अँपमध्ये असलेल्या प्रायव्हसी सेटिंगबाबत ते अनभिज्ञ असतात. ज्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट केलेली खासगी अपडेट सार्वजनिक होऊन सर्वांना दिसते. याचा गैरफायदा घेऊन चोरटे गुन्हा करतात.

सोशल मीडियावर व्यक्त होताना सर्वांनी सामाजिक भान जपणे गरजेचे आहे. एखाद्या पोस्टमुळे इतर कोणी किंवा आपण स्वतःही अडचणीत येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. फिरायला जाण्यासारख्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी सार्वजनिक करून दाखवणे योग्य नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक याचा फायदा घेऊ शकतात.

                                                              -अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त,
                                                                           पिंपरी-चिंचवड.

 

Back to top button