पुणे : दगडूशेठ मंदिर, शनिवारवाड्याची सुरक्षितता धोक्यात

पुणे : दगडूशेठ मंदिर, शनिवारवाड्याची सुरक्षितता धोक्यात
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर

पुणे : प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि ऐतिहासिक शनिवारवाडा या दोन्ही वास्तूंची सुरक्षितता धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिस यांनी केलेल्या तपासणीत ही बाब आढळून आली आहे. या ठिकाणी घातपाताची शक्यता या यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

पुणे पोलिस आणि भारतीय पुरातत्व विभाग यांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रातूनही ही बाब उघड झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला हजारो भाविक दररोज दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर ऐतिहासिक शनिवारवाड्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

या दोन्ही वास्तू एकमेकांपासून अगदी जवळच्या अंतरावर आहेत. मात्र, या दोन्ही वास्तू आता सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि राज्य पोलिस यांनी या दोन्हीही वास्तूंच्या सुरक्षिततेसंबंधीची काही महिन्यांपूर्वी तपासणी केली होती. त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

शनिवारवाडा
शनिवारवाडा हे एक संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असून, ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या आधिपत्याखाली येते. त्यानुसार या विभागाच्या पुणे उपमंडळाच्या संरक्षण सहायक यांनी महापालिकेला पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीत ज्या त्रुटी आढळल्या आहेत, त्या महापालिकेला कळविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने गणेशोत्सवादरम्यान शनिवारवाड्याच्या बाहेरील बाजूला जी अनधिकृत दुकाने लावली जातात त्याचा उल्लेख आहे.

दगडूशेठ गणपती मंदिर आणि शनिवारवाडा यांच्या सुरक्षिततेबाबत काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यासंदर्भात तातडीने आढावा घेऊन महापालिकेच्या वतीने आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना केल्या जातील.
                                                                     – विक्रम कुमार,
                                                                   आयुक्त, पुणे मनपा

दगडूशेठ मंदिर

मंदिराच्या सुरक्षिततेच्या त्रुटींबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यातील काही प्रमुख बाबी :
मंदिराच्या दोन्ही बाजूंना वाळूने भरलेली पोती व बुलेट प्रूफ यंत्रणा हवी.
बाप्पाच्या मुखदर्शनासाठी असलेली साधी काच बदलून बुलेट प्रूफ करावी.
व्हीआयपी गेटमधून येणार्‍या भाविकांची कडक तपासणी व्हावी.
उत्सवकाळात अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा असावी.
मंदिर परिसरातील घरे, दुकाने व इमारती यांची वारंवार तपासणी करणे गरजेचे.
मंदिराबाहेर उच्च दर्जाचे स्कॅनर बसवून आत जाणार्‍या प्रत्येक भाविकाची कडक तपासणी आवश्यक.
'आपत्कालीन वेळी बाहेर पडण्याचा मार्ग' अशी पाटी व्हीआयपी गेटवर हवी.
सुरक्षा यंत्रणा तपासणीसाठी मंदिर परिसरात अधूनमधून मॉकड्रिल करण्याची आवश्यकता.
सुरक्षा यंत्रणेची आदर्श संहिता (एसओपी) तयार करणे गरजेची.
पत्राशेड लावल्यामुळे या ठिकाणी घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news