पुणे : पीएमपीची सेवा आता फक्त शहरात; ग्रामीण मार्ग टप्प्याटप्प्याने बंद होणार | पुढारी

पुणे : पीएमपीची सेवा आता फक्त शहरात; ग्रामीण मार्ग टप्प्याटप्प्याने बंद होणार

प्रसाद जगताप
पुणे : पीएमपीची पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह पीएमआरडीए हद्दीत सेवा सुरू आहे. त्यातच पीएमपीने काही ग्रामीण भागातसुद्धा मार्ग सुरू केले आहेत, परंतु पुणेकरांना बसगाड्या अपुर्‍या पडत असल्यामुळे आणि गेल्या अनेक दिवसांपासून असलेल्या एसटीच्या मागणीमुळे ग्रामीण भागातील सेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतला आहे.

त्यामुळे लवकरच पीएमपीची सेवा ही शहरी भागाकरिताच मर्यादित असेल. त्याकरिता बकोरिया एक पत्र देऊन एसटीने ग्रामीण भागात आपली सेवा तातडीने वाढवावी. आम्ही आमची सेवा टप्प्याटप्प्याने मागे घेत आहे, असे सांगणार आहेत. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार गाड्या आहेत. पुण्याच्या लोकसंख्येनुसार त्या सध्या अपुर्‍या आहेत.

तरीही, पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागातील 100 पेक्षा अधिक मार्गांवर आपली सेवा सुरू ठेवली आहे. परिणामी, पुणेकरांना गाड्या उपलब्ध होत नाहीत. गाड्या प्रवाशांच्या गर्दीने भरून वाहत आहेत. प्रवाशांना तासन् तास बसची वाट पाहत थांब्यावर उभे राहावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर बकोरिया यांनी ग्रामीण भागातील गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या गाड्या वाढल्या की, पीएमपी लगेचच आपल्या ग्रामीण मार्गावरील बस कमी करणार आहे.

  • शहराबाहेर सुरू असलेले पीएमपीचे एकूण मार्ग- 104
  • पूर्वीचे ग्रामीण हद्दीतील मार्ग – 57
  • नव्याने सुरू करण्यात आलेले मार्ग – 47
  • पुणे-पिंपरी शहरात धावत असलेल्या गाड्यांची संख्या- 1290
  • एकूण बसगाड्या -2 हजार 142

एसटी अधिकार्‍यांशी माझे नुकतेच बोलणे झाले आहे. आम्ही पीएमपीची ग्रामीण भागात सुरू असलेली पीएमपीची सेवा बंद करणार आहोत. एसटी प्रशासनाला तत्काळ पर्यायी व्यवस्था आणि गर्दीच्या मार्गावर गाड्या वाढविण्यास सांगितले आहे. एसटीची ग्रामीण मार्गांवर सेवा वाढल्यावर पीएमपीची ग्रामीण भागातील सेवा तत्काळ बंद केली जाईल.-                                                                       ओमप्रकाश बकोरिया,
                                                   अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

पीएमपीच्या अधिकार्‍यांशी बोलणे झाले आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेजुरीच्य मार्गावर गाड्या वाढविल्या आहेत. पीएमपीकडून जशी गाड्या वाढविण्यासंदर्भात माहिती प्राप्त होईल, त्या मार्गांवर तत्काळ एसटीच्या गाड्या वाढविल्या जातील.
                                                                    – ज्ञानेश्वर रणावरे,
                                                 विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

Back to top button