पुणे : साखर कारखान्यांना मिळणार अधिकचे 40 कोटी | पुढारी

पुणे : साखर कारखान्यांना मिळणार अधिकचे 40 कोटी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने इथेनॉलच्या खरेदी दरात लिटरमागे सरासरी दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यापासून होणार आहे. याचा फायदा पुणे जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांना तसेच ऊस उत्पादकांना होणार आहे. यामुळे या कारखान्यांना अधिकचे चाळीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यात सहकारी व खासगी असे एकूण सतरा साखर कारखाने असले, तरी त्यातील चौदाच कारखान्यांत इथेनॉलचे उत्पादन होते. छत्रपती, भीमाशंकर आदी कारखान्यांत इथेनॉलचे उत्पादन होत नाही. जिल्ह्यातील साखर कारखान्यांची इथेनॉलनिर्मितीची क्षमता सतरा ते अठरा कोटी लिटर इतकी आहे. काही कारखान्यांमध्ये इथेनॉलचे प्रकल्प करण्यात येत असल्याने ही क्षमता आगामी काळात वाढणार आहे.

केंद्र सरकारने उसाच्या रसापासून होणार्‍या इथेनॉलचे दर 63.45 रुपये प्रतिलिटरवरून 65.60 रुपये, सी हेवी मोलॅसिसपासूनचा दर 46.66 रुपयांवरीन 49.40 रुपये तर बी हेवी मोलॅसिसपासूनचा दर 59.08 रुपयांवरून 60.73 रुपये इतका केला आहे. इथेनॉलच्या किमतीतील वाढ ही सरासरी दोन रुपये असल्यानेे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे उत्पन्न 40 कोटी रुपयांनी वाढणार आहे.

वाढीव उत्पन्नाचा फायदा पर्यायाने ऊस उत्पादकांना होणार आहे. एफआरपीचे पेमेंट अदा करणे यामुळे कारखान्यांना सुलभ होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सन 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम साखर उद्योगावर होणार आहेत.

Back to top button