कान्हुर मेसाईत बिबट्या जेरबंद | पुढारी

कान्हुर मेसाईत बिबट्या जेरबंद

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  कान्हुर मेसाई (ता. शिरूर) येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले होत असताना नागरिक भीतीच्या वातावरणात होते. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत असताना वन विभागाच्या वतीने लावलेल्या पिंजर्‍यामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात सोमवारी (दि. 1) शिरूर वन विभागाच्या पथकाला यश आले आहे. कान्हुर मेसाई येथील ढगेवाडी येथे वारंवार बिबट्याचे नागरिकांना दर्शन होऊन कित्येकदा प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याने येथे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती.

शिरूर वन विभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या माध्यमातून येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता. सूर्यकांत ढगे, दत्ता शिंदे, दत्ता खर्डे हे शेताकडे गेले असता त्यांना या पिंजर्‍यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना मिळताच वनपाल ऋषिकेश लाड, वनरक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर हनुमंत कारकुड यांनी तेथे धाव घेत सूर्यकांत ढगे, दत्ता शिंदे, दत्ता खर्डे, अंकुश खर्डे, बाबूराव खर्डे, म्हातारबा खर्डे, रामभाऊ शिंदे यांसह आदी नागरिकांच्या मदतीने या बिबट्याला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात हलविले.

दरम्यान, बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामस्थ व नागरिक वन विभागाच्या कामगिरीचे कौतुक करीत आहेत.

Back to top button