पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमपीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे दिवाळीनंतर पीएमपीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक घेऊन आराखडा निश्चित करू,' असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपीच्या अधिकार्यांना सांगितले. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाहतूक कोंडीचा विषय गाजला. अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी पालकमंर्त्यांकडे केली. त्यावर पाटील यांनी अनेक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी गुरुवारी पीएमपीत आढावा बैठक घेतली.
यावेळी पीएमपीच्या बस ताफ्यापासून पीएमपीचे कामकाज कसे चालते इथपर्यंत सर्व बाबींचा आढावा पाटील यांनी घेतला. तसेच शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम असेल, तर खासगी वाहनांची संख्या कमी होऊन कोंडीच्या समस्येतून दिलासा मिळू शकतो, असे पाटील यांनी पीएमपीच्या अधिकार्यांना सांगितले. पीएमपीच्या अध्यक्षपदावर नेमणूक होणारा अधिकारी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदलून जातो. मात्र, बकोरिया या ठिकाणी कार्यकाळ पूर्ण करतील, अशी अपेक्षा पाटील यांनी बैठकीदरम्यान व्यक्त केली.