पुणे : प्रमुख १३५ रस्ते टाकणार कात ! वाचा सविस्तर | पुढारी

पुणे : प्रमुख १३५ रस्ते टाकणार कात ! वाचा सविस्तर

पांडुरंग सांडभोर :

पुणे : शहरातील प्रमुख 135 रस्ते पुन्हा नव्याने तयार करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी तब्बल 500 कोटींचा खर्च येणार आहे. या रस्त्यांमध्ये लक्ष्मी रस्ता तसेच मध्य वस्तीतील टिळक, बाजीराव, केळकर रस्ता या प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.

पावसामुळे शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून गेल्या 15 दिवसांमध्ये शहरातील सर्व रस्त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 12 मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या देखभाल दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची लांबी 115 कि.मी. इतकी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरातील सर्व 135 प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत हे रस्ते खराब झाल्यानंतर त्यांची त्या-त्या वेळेस केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली.
मात्र, आता या रस्त्यांची डागडुजी न करता ते खोदून पुन्हा नव्यानेच करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. यामधील काही डांबरी रस्ते सिमेंट क्राँकीटचे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व मिळून एकूण 500 कोटींचा खर्च येणार असून, त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे पथ विभागाच्या सर्वेक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील रस्त्यांची वस्तुस्थिती

एकूण लांबी
1400 कि.मी.

शहरातील
80 टक्के वाहतूक
12 मीटर रस्त्यावरून

12 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांची लांबी
971 कि.मी.

सर्वेक्षणाअंती 115 कि.मी.च्या रस्त्यांची देखभाल
दुरुस्ती आवश्यक
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी येणारा अंदाजे खर्च
400 कोटी
काम करण्यासाठीचा आवश्यक कालावधी
6 महिने
डांबरऐवजी काँक्रीट रस्त्यासाठी
येणारा खर्च 100 कोटी

पालकमंत्र्यांच्या बैठकीत होणार निर्णय
शहरातील रस्त्यांच्या डागडुजीच्या सर्वेक्षणातून ज्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत, त्यासंबंधीचा अहवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या येत्या शनिवारी होणार्‍या आढावा बैठकीत ठेवला जाण्याची शक्यता आहे. त्यात या 135 रस्त्यांच्या नूतनीकरणाच्या कामावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

 

सातत्याने डागडुजी केल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांची गुणवत्ता राहिलेली नाही. त्यामुळे आता केवळ खड्डे बुजवून डागडुजी न करता संपूर्ण रस्ताच खोदून नव्याने करण्याचे नियोजन सुरू आहे.

                                                        – विक्रम कुमार,  आयुक्त, पुणे मनपा.

Back to top button