राज्यात पाच दिवस हलक्या सरींचा अंदाज, मोठा पाऊस कमी झाला | पुढारी

राज्यात पाच दिवस हलक्या सरींचा अंदाज, मोठा पाऊस कमी झाला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील मोठा पाऊस कमी झाला असला तरीही पुढील किमान चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर अंदमान समुद्र ते दक्षिण अंदमान समुद्रापासून पुढे दक्षिण बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचे रूपांतर 22 ऑक्टोबरला तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे.

त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी या पट्ट्याचे रूपांतर अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार असून 24 ऑक्टोबरला या अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यांचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. बंगालच्या उपसागरातून हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल, बांगलादेशची किनारपट्टी, तसेच ईशान्येकडील ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. त्यामुळे ईशान्य भागात पाऊस वाढणार आहे. मात्र, राज्यातील पाऊस कमी होणार आहे. राज्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पावसानंतर खानदेश व उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवार (दि. 21) व शनिवारी (दि.22) तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असून शनिवारपासून मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात सूर्यप्रकाशासह उघडीप राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चक्रीवादळाचा राज्याला धोका नाही
बंगालच्या उपसागरात निर्माण होणार्‍या चक्रीवादळाचा महाराराष्ट्राला कोणताही धोका नसून हे चक्रीवादळ ‘पाडवा-भाऊबीज’नंतर (दि. 26) ओडिशाच्या किनारपट्टीला बगल देऊन प. बंगाल व बांगलादेशकडे निघून जाण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या दापोली समोरील ते लक्षद्वीपच्या पश्चिम किनारपट्टीदरम्यान असलेल्या पूर्व-पश्चिम हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे.

Back to top button