शेतकऱ्यांचा आधुनिक साथीदार  ‘ट्रॅक्टर’ सुसाट..! | पुढारी

शेतकऱ्यांचा आधुनिक साथीदार  ‘ट्रॅक्टर’ सुसाट..!

पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या शेतीकामात मदत करणारा साथीदार म्हणून बैलांची ओळख. मात्र, 21 व्या शतकात आता त्यांची जागा ‘ट्रॅक्टर’ या वाहनाने घेतली आहे. शेतीतील कोणतेही काम असो, ट्रॅक्टरच्या मदतीने अतिशय वेगाने होते. त्यामुळे छोटे शेतकरी वगळता बागायतदार शेतकर्‍यांकडे प्रत्येकाकडेच ट्रॅक्टर आहे. आणि अशाच या शेतकर्‍यांचा आधुनिक साथीदार असलेल्या या वाहनाची संख्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहर मिळून आतापर्यंत 59 हजार 275 इतकी झाली आहे.

पूर्वी पुणे हे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाई. 90 च्या दशकानंतर हळूहळू वाहने वाढली. आता फक्त पुणे शहराची वाहनसंख्या 43 लाख तर पिंपरी-चिंचवड शहराची वाहनसंख्या 22 लाखांपेक्षा अधिक आहे. या दोन्ही शहरांमध्ये शेतीसाठी आवश्यक असलेल्या ट्रॅक्टरचीदेखील खरेदी होत असून, आतापर्यंत 60 हजार ट्रॅक्टर खरेदी करण्यात आल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात केली आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राहणार्‍या व्यक्तींकडून या ट्रॅक्टरची खरेदी होत नाही. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या आजूबाजूला असलेला ग्रामीण भाग म्हणजेच जिल्ह्याच्या भागातच ‘ट्रॅक्टर’ची सर्वाधिक खरेदी होत असल्याचे समोर येते. कारण या भागातील शेतकरी अजूनही शेती करतात. त्यांची उपजीविका अजूनही शेतीवरच आहे. त्यामुळे ट्रॅक्टर विक्रेत्या विविध नामांकित कंपन्यांची दुकाने जिल्ह्याच्या भागातच पाहायला मिळतात.

ट्रॅक्टर चालविण्यासाठी स्वतंत्र परवाना आवश्यक

प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ट्रॅक्टर चालविण्यासाठी वेगळा परवाना (लायसन्स) घ्यावे लागते. बहुतांश शेतकरी फक्त ट्रॅक्टरच खरेदी करतात. मात्र, तो चालविण्यासाठी परवानाच घेत नाहीत. त्यामुळे ज्या शेतकर्‍याकडे ट्रॅक्टर आहे, त्याने परवाना असल्याशिवाय ट्रॅक्टर चालवू नये, अन्यथा आरटीओकडून मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येते, असे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button