पुणे: धामारीत बेल्हा-जेजुरी राज्यमार्ग तीन तास बंदगावातही, शिरले पाणी | पुढारी

पुणे: धामारीत बेल्हा-जेजुरी राज्यमार्ग तीन तास बंदगावातही, शिरले पाणी

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: सोमवारी (दि. १७) रात्री झालेल्या ढगसदृश्य पावसामुळे धामोरी (ता. शिरूर) येथे बेल्हा-जेजुरी मार्गावर सोमवारी अडीच फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने हा रस्ता तब्बल तीन तास बंद राहिला होता.

या रस्त्याने वाहणारे पाणी वेशीतून आत गेल्याने गावातही पाणी शिरले होते. पूल पाण्याखाली गेला तरच रस्ता बंद राहतो; मात्र धामारी येथे साळुंखे वस्तीकडे जाणाऱ्या मोरीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चुकीच्या पद्धतीने झाल्याने रात्रीच्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा प्रवाह थेट काँक्रीटीकरण असलेल्या रस्त्यावर आला आणि धामारी गावच्या वेशीतून पाणी आत शिरले. हा प्रवाह सुमारे अडीच फूट उंचीचा असल्याने सार्वजनिक वाहतूक बंद राहिली होती. रात्री दीड वाजेच्या सुमारास ही प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवलेल्या वाहनधारकांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली.

आमराई नगर येथील गावतळे ५० वर्षात पहिल्यांदाच पूर्ण भरले असून बाका प्रसंग ओळखून तातडीने जेसीबी लावून सांड मोकळी करण्यात आल्याने तळे फुटण्याचा धोका टळल्याचे माजी उपसरपंच अर्जुन भगत यांनी सांगितले. सर्वच पिके पाण्याखाली गेली असून कांदा, सोयाबीन, मका या पिकांचे जवळपास पूर्णतः नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीची तातडीने प्रशासनाने पाहणी करून पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच संपत कापरे यांनी केली आहे.

Back to top button