तळेगाव दाभाडे : पावसाच्या हजेरीने भातपिकाची कापणी लांबणीवर | पुढारी

तळेगाव दाभाडे : पावसाच्या हजेरीने भातपिकाची कापणी लांबणीवर

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप भातपीक, सोयाबीनची कापणी तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी लांबणीवर पडली आहे.

भातखचरात पाणीच पाणी
सध्या मावळ तालुक्यात परतीचा जोरदार पाऊस पडत असून, यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. पावसामुळे शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक ठिकाणी भात खाचरे तर पावसांच्या पाण्याने तुडूंब भरून वाहत आहेत.

ऊस तोडणी खोळंबली
या जोरदार पावसाने संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणीदेखील लांबणीवर पडली आहे. ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना बसून रहावे लागत आहे. कारखान्याचा बॉयलर प्रज्वलन व ऊसमोळी टाकण्याची कार्यक्रम नुकताच यशस्वी संपन्न झालेला आहे.

कामगारांच्या घरात पाणी
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांची या जोरदार पावसाने दैना झालेली आहे. उभारलेल्या तात्पुरत्या घरामध्ये पाणी जमा होत आहे. या पावसाने ऊसतोड कामगार, कुटुंबीय तसेच ऊस वाहतूक करणारी बैल, जनावरे या सगळ्याना जोरदार पावसाचा सामना करावा लागत आहे. काही कामगारांच्या कुटुंबीयांना तर या जोरदार पावसाने स्वयंपाक करणे अडचणीचे होत आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पाठारे व सचिव मोहन काळोखे यांनी ऊस गाळपाचे पूर्ण नियोजन केलेले असताना या मान्सूनच्या परतीच्या जोरदार पावसाने सर्व नियोजनवर पाणी पडले आहे. या पावसाने ऊसतोड लांबणीवर पडली आहे.

तांदूळ काळा पडण्याची भीती
तालुक्याच्या बहुतेक भागातील भातपीक कापणीसाठी तयार झालेले असून, या निसवलेल्या भाताच्या ओव्यावर पाणी पडल्यावर आतील तांदूळ काळा होण्याची भीती शेतकर्‍यांच्या मनामध्ये घर करून राहिली आहे. त्यामुळे शेतकरीबांधव पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

Back to top button