पुणे : सुकामेव्यात स्वस्ताई ; दहा ते पंधरा टक्क्यांनी दर उतरले | पुढारी

पुणे : सुकामेव्यात स्वस्ताई ; दहा ते पंधरा टक्क्यांनी दर उतरले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जगभरात सुकामेव्याच्या उत्पादनात वाढ झाल्याने मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सुकामेव्याची आवक वाढली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात मागणीही वाढली आहे. मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात सुकामेवा बाजारात दाखल होत असल्याने भावात दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.  दिवाळीनिमित्त विविध संस्था, कंपन्यांकडून अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना विविध प्रकारचा सुकामेवा असलेले बॉक्स भेट स्वरूपात देण्यात येतात.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे सुकामेव्याच्या मागणीत घट झाली होती. यंदा सर्व काही पुर्वपदावर आल्याने सुकामेव्याला प्रचंड मागणी आहे. याखेरीज, दिवाळीनिमित्त तयार करण्यात येणार्‍या फराळातही सुकामेव्याचा वापर होत असल्याने फराळासाठीही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. यंदा जगभरात सुकामेव्याचे चांगले उत्पादन झाल्याने बाजारात सुकामेवा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाव खाणारा सुका मेवा यंदा मात्र चांगलाच नरमल्याचे चित्र आहे.

पुण्याच्या बाजारात येथून येतो सुकामेवा
बदाम – कॅलिफॉर्निया, ऑस्ट्रेलिया
काजू – गोवा, कर्नाटक,
कोकण, केरळ
मनुके – सांगली
खारा पिस्ता – इराण, अमेरिका, कॅलिफोर्निया
अक्रोड – अमेरिका, चीली व भारताच्या काही भागातून

सुकामेवा दर (प्रतिकिलो)
बदाम 560 ते 625
अक्रोड 700 ते 1000
काजू 660 ते 1200
खारा पिस्ता 900
मनुके 230 ते 300

Back to top button