शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजारांचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या आजारांची तीव—ता वाढल्यास प्लेटलेट्सची संख्या कमी होत असल्याने सर्वच रुग्णालयांमध्ये प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. वर्षभराच्या तुलनेत प्लेटलेट्सच्या मागणीत 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. साधारणपणे 15 ऑगस्टनंतर फारशी रक्तदान शिबिरे झालेली नाहीत. त्यामुळे प्लेटलेट्सची कमतरता वाढली आहे. रक्त 35 दिवसांपर्यंत टिकत असले तरी प्लेटलेट्स 5 दिवसांपर्यंतच टिकू शकतात. तसेच, निरोगी दात्याच्या रक्तातून प्लेटलेट काढण्याच्या प्रक्रियेस दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.
डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णाला प्लेटलेट्सची गरज असतेच असे नाही. औषधोपचारानेही रुग्ण बरा होऊ शकतो. ज्या रुग्णांच्या रक्तातल्या प्लेटलेट कमी झालेल्या आहेत, अशाच रुग्णांना बाहेरून प्लेटलेट द्याव्या लागतात. रक्तदानानंतर रक्ताचे विघटन करून प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात. मात्र, प्लेटलेटचा साठा पाच दिवसच करता येतो. त्यामुळे बहुतांश रक्तपेढ्या प्लेटलेटची मागणी आल्यावर रक्तविघटन प्रक्रिया करून प्लेटलेट्स वेगळ्या करतात. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात डेंग्यू आणि पावसाळी आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरातील काही रक्तपेढ्यांमध्ये तुटवडा जाणवत असल्याची स्थिती आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव आणि प्लेटलेट्सची मागणी याबाबतचा डेटा वापरून उच्च मागणी असलेल्या काळाचे आणि क्षेत्रांचे नियोजन केले जाऊ शकते. सार्वजनिक आरोग्य विभागांसोबत भागीदारी करून डेंग्यू प्रकरणांवरील वास्तविक-वेळेतील डेटा मिळवता येईल आणि पुरवठा साखळीत आवश्यक बदल केले जाऊ शकतात. प्लेटलेट्सच्या दानाचे महत्त्व अधोरेखित करणार्या जागरूकता मोहिमा राबवता येऊ शकतात. नियमित दात्यांना प्लेटलेट्स दान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
डॉ. तनिमा बरोनिया, उपनिदेशक, आयसीयू विभाग
सध्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोठ्या रुग्णालयांमधील बेड पूर्ण क्षमतेने व्यापले आहेत. रुग्णातील प्रति क्युबिक एमएलमधील प्लेटलेटसची संख्या 25 हजारांहून कमी झाल्यास बाहेरुन प्लेटलेट देण्याची गरज भासते. प्लेटलेटच्या एका बॅगची किंमत 11 ते 15 हजार रुपये आहे. किमतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाने यावर विचार करण्याची गरज आहे. सध्या रक्ताचे नाते ट्रस्टकडे प्लेटलेटच्या मागणीसाठी दिवसाला 50 फोन येत आहेत. प्लेटलेटचा तुटवडा कमी होण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे. ताप आल्यास आजार अंगावर न काढता ताबडतोब तपासणी करुन घेतल्यास डेंग्यू केवळ औषधोपचारांनी बरा होऊ शकतो.
- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट.
डेंग्यूच्या विषाणूमुळे रक्ताच्या घटकांचे, विशेषत: प्लेटलेटची निर्मिती करणार्या अस्थिमज्जा पेशींचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे प्लेटलेट्सच्या उत्पादनात तात्पुरती घट होते.
शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने प्लेटलेट्सवर हल्ला होतो. त्यामुळेही संख्या कमी होते.
डेंग्यूमध्ये प्लीहा मोठा होऊन अधिक सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे अधिक प्लेटलेट्स संकुचित होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
डेंग्यू विषाणू प्लेटलेट्सला थेट संक्रमित करून नष्ट करू शकतो. त्यामुळे रक्तप्रवाहातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते.
प्लेटलेट्स घटल्यामुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.