पिण्याच्या पाण्यात सांडपाणी; वडगाव शेरी परिसरातील समस्या | पुढारी

पिण्याच्या पाण्यात सांडपाणी; वडगाव शेरी परिसरातील समस्या

वडगाव शेरी; पुढारी वृत्तसेवा: वडगाव शेरी परिरातील गणेशनगर आणि खराडीतील संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने या पाण्याची दुर्गंधी येत आहे. यामुळे परिरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गणेशनगर भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. या परिसरामध्ये रात्री उशिरा पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे.

पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत आहे. यामुळे पाण्याला मैलापाणीसारखी दुर्गंधी येत आहे. पाणी आल्यानंतर अर्धा तास नागरिकांना हे दूषित पाणी सोडून द्यावे लागते. त्यानंतर गाळून आणि उकळून पाणी घ्यावे लागत आहे. दूषित पाण्यामुळे गेस्ट्रो, अतिसारयांसारखे साथीचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.रहिवाशांनी सांगितले, की गेल्या अनेक दिवसांपासून आमच्याकडे दूषित पाणी येत आहे. पाणी आल्यानंतर सुरुवातीला वीस मिनिट मैलापाणी मिश्रित दूषित पाणी येते. याप्रमाणेच खराडीतील संभाजीनगरमध्ये मैलापाणी मिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे.

सांडपाणी वाहिनीत गाळ जमा झाल्याने मैलापाणी पाइपमधून बाहेर पडते. त्यामुळे ते पाणी जलवाहिनीत जात होते. वडगाव शेरीतील गणेशनगर आणि खराडीतील संभाजीनगरमध्ये काम सुरू केले आहे. लवकरच दूषित पाण्याची समस्या सुटेल.

                           -नितीन जाधव, अधिकारी, बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग

Back to top button