पुणे जिल्ह्यातही अनुभवा कास पठारचं सौंदर्य ! खेडमध्ये रंगी फुलांची उधळण, मनमोहक फुले करताहेत आकर्षित | पुढारी

पुणे जिल्ह्यातही अनुभवा कास पठारचं सौंदर्य ! खेडमध्ये रंगी फुलांची उधळण, मनमोहक फुले करताहेत आकर्षित

पुणे; पुढारी वृत्तसंस्था: खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भोमाळे, टोकावडे, भिवेगाव, कारकुडीसह भीमाशंकर अभयारण्यातील माळरानांवर सध्या सोनकी, सदाबहार, कळलावी, तेरडा यासारख्या विविध रंगी फुलांची उधळण सुरू आहे. कास पठाराप्रमाणेच येथील माळरानांवर सध्या पिवळी, पांढरी, जांभळी अशा विविव प्रकारची व रंगांची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर हा या रानफुलांचा हंगाम असून, जास्तीत जास्त पर्यटकांनी याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

जागतिक वारसा लाभलेल्या कास पठाराप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातदेखील सध्या विविध रंगीबेरंगी रानफुलांचा हंगाम सुरू आहे. पुण्यापासून केवळ 55 ते 60 किलोमीटरवर असलेल्या खेड तालुक्यातील भोमाळे, टोकावडे, भिवेगाव, कारकुडी गावालगतच्या माळरानांवर सोनकी, सदाबहार, कळलावी, तेरडा ही फुले पहायला मिळत आहेत.

सोनकीच्या पिवळ्याधम्मक फुलांचे गालिचे सर्वत्र पसरले आहेत. सोनकीच्या पिवळ्या फुलांमुळे परिसरात निर्सग जणू भंडा-याची उधळण करत असल्याचा भास होत आहे. याशिवाय इतरही अनेक रानफुले चांगलीच बहरली आहेत. विविध रंगी फुलांसोबतच फुलो-यात आलेली भातशेती, पक्षांचे आवाज व हिरवागार निसर्ग पर्यटकांना साद घालत आहे. रानफुलांचा हंगाम ऑक्टोबरअखेरपर्यंत असल्याचे स्थानिक वनरक्षक अंकुश गुट्टे यांनी सांगितले

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या निसर्गरम्य वातावरण असून, खेड वनपरिक्षेत्रअंतर्गत येणार्‍या पश्चिम भागातील भोमाळे, टोकावडे, भिवेगाव कारकुडी या परिसरातील रानमाळावर सोनकीसह विविध प्रकारची रानफुले दिसत आहेत. याशिवाय लहान-मोठे धबधबे देखील पाहिला मिळत आहे. या परिसरात ऑगस्ट ते ऑक्टोबर अखेरपर्यंत फुलांचा हा हंगाम असतो. जास्तीत जास्त पर्यटकांनी निसर्गाच्या अद्भुत रुयाचा अनुभव घ्यावा.
                                   – प्रदीप रौंधळ, वनपरीक्षेत्र अधिकारी, खेड

Back to top button