पुणे : वैयक्तिक लाभ योजनेत 8 हजार शेतकर्‍यांचा समावेश | पुढारी

पुणे : वैयक्तिक लाभ योजनेत 8 हजार शेतकर्‍यांचा समावेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून यावर्षी आठ हजार 39 शेतकर्‍यांची वैयक्तिक लाभ योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे. यामध्ये एकूण तेरा योजनांचा समावेश असून, उपलब्ध निधीतून जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम केल्याची माहिती कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी सांगितली.

दरवर्षी जिल्हा परिषदेकडून विविध विभागांकडून वैयक्तिक लाभ योजना राबविली जाते. त्याद्वारे शेतीउपयोगी तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी वस्तूंवर अनुदान दिले जाते. त्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) बँकेत जमा केले जाते. यावर्षी कृषी विभागाकडून राबवण्यात आलेल्या योजनेसाठी 34 हजार जणांनी अर्ज केले होते.

त्यापैकी 27 हजार 500 अर्ज हे पात्र ठरविण्यात आले. परंतु उपलब्ध निधीमध्ये ताडपत्री, क्रेट्स्, अडीच इंची पाईप, तीन एचपी पंप आदी वस्तूंसाठी 8 हजार 369 लाभार्थ्यांची निवड केली. या निवड केलेल्या लाभार्थ्यांना वस्तू खरेदीचे आदेश दिले असून, तशा पंचायत समित्यांना सूचना केल्या असल्याची माहिती देशमुख यांनी सांगितली.

येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्कचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर कृषी विभागाला येणार्‍या निधीतून उर्वरित पात्र लाभार्थ्यांनादेखील वैयक्तिक लाभ योजनेचा लाभ मिळणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावर्षी मोठ्या वस्तू देण्याऐवजी जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी छोट्या वस्तूंच्या लाभार्थ्यांची निवड करण्यावर भर दिला. परिणामी त्यासाठी आलेले शंभर टक्के अर्ज यामध्ये समाविष्ट केले असल्याने ड्रॉ पद्धतीचा अवलंब ही करावा लागला नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अर्ज प्रक्रियेसाठी लागतो खर्च…
वैयक्तिक लाभ योजनेसाठी शेतकर्‍यांना 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. यासाठी शेतकरी त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूसाठी अर्ज करतात. मात्र, अनेकांची यामध्ये निवड होत नाही. अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकर्‍यांना पैसे मोजावे लागतात, पुन्हा तो अर्ज घेण्यासाठी, जमा करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने दुबार लाभ बंद करून शंभर टक्के लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

Back to top button