पिंपरी : टवाळखोरांना वठणीवर आणणार! पोलिस बनवणार स्थानिक महिलांची कमिटी | पुढारी

पिंपरी : टवाळखोरांना वठणीवर आणणार! पोलिस बनवणार स्थानिक महिलांची कमिटी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: परिसरात गोंधळ घालणार्‍या टवाळखोरांची मस्ती जिरवण्यासाठी पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे. शहरातील गल्लीबोळात ‘वॉच’ ठेवण्याची स्थानिक महिलांची कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. कमिटीतील महिला पोलिसांच्या मदतीने परिसरातील मुलांना सुधरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच, प्रसंगी पोलिसांना सांगून अशा टवाळखोरांना वठणीवर
आणणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलिस ‘वॉच’ ठेवू शकत नाहीत.

त्यामुळे पोलिसांनी स्थानिक महिलांची मदत घेण्याचे ठरवले आहे. गृहिणी महिला दररोज घरात असतात. त्यांना परिसरातील कोणती मुले वाममार्गाला किंवा वाईट संगतीत आहेत, याची माहिती असते. तसेच, शेजारी राहणारी मुले कोठे बसून गोंधळ व नशा करतात, याचीदेखील माहिती त्यांना असते. अशा मुलांची माहिती महिला पोलिसांना देणार आहेत. त्यानुसार, पोलिस संबंधित मुलांचे समुपदेशन करणार आहेत. यातील टवाळखोर समजतील अशी भाषा वापरून त्यांना वठणीवर आणले जाणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्थनिक पोलिसांना आदेश दिले असून, त्यानुसार कमिटी स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Back to top button