कात्रजला भुयारी मार्गात अडकला ट्रक; दत्तनगरला वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय | पुढारी

कात्रजला भुयारी मार्गात अडकला ट्रक; दत्तनगरला वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: परिसरातील दत्तनगर भुयारी मार्गात रविवारी दुपारी एक सिमेंट मिक्सर (आरएमसी ट्रक) अडकल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे परिसरातील नागरिक, वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी-कोळेवाडी या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. वाढत्या वाहतुकीमुळे शहरात जाण्यासाठी वाहनचालक दत्तनगर भुयारी मार्गाचा वापर करतात. हा भुयारी मार्ग कमी उंचीचा व अरुंद आहे. तसेच पावसाळ्यात नेहमी पाणी साठते, अशा कारणांनी नेहमीच कोंडी होते.

कात्रज बाह्यवळण महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामध्ये भुयारी मार्गाची उंची व रुंदी वाढवून मोठा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. या घटनेने दत्तनगर भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

‘घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या कर्मचार्‍यांनी भुयारी मार्गात अडकलेला आरएमसी ट्रक बाहेर काढला. त्यानंतर तेथील वाहतूक सुरळीत केली.’

                                                    – दादासाहेब चुडाप्पा, पोलिस निरीक्षक

Back to top button