पुणे : पर्यटनासह व्यायामासाठी हक्काची पर्वती टेकडी | पुढारी

पुणे : पर्यटनासह व्यायामासाठी हक्काची पर्वती टेकडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पर्वती टेकडीला केवळ पर्यटन व व्यायामासाठी उत्तम जागा असे संबोधले जाते. मात्र, या टेकडीचा इतिहास समजून घेणारे फारच कमी आहेत. मनाला थोडा विरंगुळा देणारे व व्यायामाचे ठिकाण असेच या टेकडीकडे पाहिले जाते. शर्यती लावून पर्वतीवर पोहोचायचे, तसेच अन्य वेगवेगळे विक्रम याच पर्वतीवर झाले आहेत.  पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे.

पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले. पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 640 मीटर (2100 फूट) आहे. सुमारे 103 पायर्‍या चढून येथे पोहोचता येते. या पायर्‍या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक, पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत.

पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय कार्तिकेय, विष्णू, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्‍यात चार लहान मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिकस्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.

पेशवे संग्रहालयाचे आकर्षण
या पर्वती टेकडीवर मराठा राजवटीच्या वापरातील ‘नाणी’, बि—टिशकालीन नाणी, विविध प्रकारच्या तलवारी, ढाल, विविध हत्यारे, बंदुका याचबरोबर पेशवे घराण्यातील व्यक्तींची चित्रे व त्यांची थोडक्यात माहिती वाचण्यास मिळते. शनिवारवाड्याचा नकाशा, 1791 नुसार पुण्यातील विविध बागांची नावे, पेशवेकालीन दरवाजांना लावण्यात येणारी कुलपे, अभ्यासासाठी वापरण्यात येणारी धुळपाटी, विविध पगड्या, हत्तीचा पाय याचबरोबर तांदूळ, गहू व कडधान्यांचे त्यावेळेचे दरपत्रक अशी विविध माहिती पाहावयास मिळते.

‘मॉर्निंग वॉक’ची खासियत
पर्वती टेकडीच्या चारही बाजूंना पुणे शहर पसरलेले आहे. त्यामुळे ‘मॉर्निंग वॉक’ पुणेकरांसाठी पर्वती म्हणजे हक्काची व्यायामशाळाच बनली आहे. पर्वतीवर अनेक विक्रम केले गेले आहेत. तीन तासात टेकडी 21 वेळा चढणे, 7 तासात 44 वेळा चढणे आदी. याचबरोबर अनेक सामाजिक संघटना अबालवृद्धांसाठी टेकडी चढण्याच्या स्पर्धा आयोजित करतात.

Back to top button