सिंहगड परिसरातील खुनाचा दहा तासांत छडा | पुढारी

सिंहगड परिसरातील खुनाचा दहा तासांत छडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मंत्रालयात नोकरी लावून देण्यासह लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अवघ्या 10 तासांत खुनाची उकल करीत आरोपींच्या मुसक्या
आवळल्या आहेत. महेश शंकरराव धुमाळ (वय 32), शिवराज किशोर प्रसाद सिंह (वय 32), शिवाजी रंगाप्पा तुमाले (वय 56), अक्षय पोपट आढाव (वय 22) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुनील राधाकिसन नलावडे (वय 54) असे खून झालेल्याचे आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता.

सुनीलने ओळखीतील कुर्डेकर दाम्पत्याच्या मदतीने महेशला मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. याशिवाय लोन मंजूर करण्यासाठी काही जणांकडून रक्कम उकळली होती. पण, त्यानंतर तो पसार झाला होता. तो गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या संपर्कात नव्हता. फसवणूक झाल्याने ते सुनीलला शोधत होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी सुनील हा वनिता कुर्डेकर हिच्या घरी आल्याची माहिती महेश धुमाळला मिळाली. फसवणूक झालेल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले.

त्यांनी सुनीलला येथे पकडून त्याला कारमधून नर्‍हे येथे आणले. तेथून त्याला निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर ते पसार झाले. दरम्यान, सिंहगड रोड पोलिस गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. खुनाचे कारण व आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर आवाहन होते.

पण, दहा तासांत आरोपींची माहिती काढून गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे, फुरसुंगी व सिरापूर येथून चौघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे दोन साथीदार पसार आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अंमलदार संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, दीपक क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button