बेल्हे : लिफ्टच्या भरवशावरच विद्यार्थ्यांचे शिक्षण ! आडगाव येथे बस थांबत नसल्याने समस्या | पुढारी

बेल्हे : लिफ्टच्या भरवशावरच विद्यार्थ्यांचे शिक्षण ! आडगाव येथे बस थांबत नसल्याने समस्या

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यात कल्याण-अहमदनगर महामार्गावरील बहुतांश विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास हा दुसर्‍याने दिलेल्या ‘लिफ्ट’च्या भरवशावर सुरू आहे. महामार्गाने जाणार्‍या जलद गतीच्या बस शाळेच्या वेळेत असल्या, तरी त्या अनेक गावांमध्ये थांबत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. दोन वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थिनीला लिफ्ट दिलेल्या दुचाकीस्वाराने रस्त्यातच तिच्यावर बलात्कार केला. यानिमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

प्रत्यक्षात रोज अहमदनगर-कल्याण, पुणे- नाशिक अशा महामार्गांवर सुद्धा एसटी बस सोडून खासगी वाहनांना हात करीत थांबणारी मुले, चार ते पाच कि.मी. सायकलवर प्रवास करून शाळेला जाणारी मुले दिसतात. काही गावांमध्ये बसला थांबा नाही, काही ठिकाणी बस वेळेवर नाही, तर कोणी गर्दीमुळे गाडीच थांबवत नाही, असेही चित्र असते. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात पाचवी ते दहावीपर्यंतच्या 167 शाळांमध्ये जवळपास 55 हजार 659 विद्यार्थी शिक्षण घेतात.

यामध्ये आणे, बेल्हे, राजुरी, आळे, वडगांव-आनंद, ओतूर, खामुडी, पिंपरी पेंढार, पिंपळवडी, उदापूर, डिगोरे, मढ, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर अशा प्रमुख मार्गांवरील गावांतील शाळांचा समावेश आहे. सर्वच शाळांमध्ये शिक्षणासाठी महामार्गावरील छोट्या-मोठ्या वस्तीतून व गावातून विद्यार्थी येतात. वेळेवर शाळेत जाता यावे, यासाठी वाहनांच्या शोधात अनेक विद्यार्थी वेळेपूर्वी दीड ते दोन तास आधी महामार्गावर येऊन थांबतात.

सकाळी महामार्गावर दहा ते पंधरा मिनिटांनी एक बस जाते. यापैकी बहुतांश जलदगती बस असल्यामुळे त्यांना प्रत्येक छोट्या गावात थांबणे शक्य होत नाही. त्यामुळेच विद्यार्थी खासगी वाहनाला लिफ्ट मागतात. शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी विविध उपक्रम सरकारतर्फे राबवले जातात. विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरामध्ये एसटीचा पास देण्यात येतो. परंतु, शाळेत ये-जा करण्यासाठी बसची सुविधाही मिळणे गरजेचे आहे.

शाळेत विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी एसटी आवश्यक आहे. ज्या गावांमध्ये एसटी सुरू करण्यात तांत्रिक अडचणी आहेत, अशा गावांतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
                                                                – महेश बांगर, माजी सरपंच.

 

Back to top button