वाहतुकीस विजेच्या खांबांचा ‘ब्रेक’; मंतरवाडी-कात्रज बाह्यवळण मार्ग समस्यांच्या विळख्यात | पुढारी

वाहतुकीस विजेच्या खांबांचा ‘ब्रेक’; मंतरवाडी-कात्रज बाह्यवळण मार्ग समस्यांच्या विळख्यात

फुरसुंगी; पुढारी वृत्तसेवा: मंतरवाडी-कात्रज बाह्यवळण मार्गावर उंड्री ते हांडेवाडी चौकादरम्यान रस्त्यात विजेचे खांब असून ते वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण कंपनीने हे खांब तातडीने हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी रुंदीकरण व क्राँकीटीकरण झाले आहे. मात्र, मंतरवाडी ते खडीमशीन चौकादरम्यानच्या रस्त्यावर विद्युत खांब असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याठिकाणी रस्ता रुंद न करता तसाच सोडून दिला आहे. त्यामुळे येथून एका वेळी एकच वाहन जाते. मोठे वाहन असेल, तर वाहन चालविताना कसरत करावी लागते.

रस्त्याच्या मध्यभागी अनेक खांब असल्याने ते वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रात्रीच्या वेळेस समोरून येणार्‍या वाहनांचे प्रखर प्रकाश दिव्यांमुळे डोळे दिपतात. यामुळे हे खांब वाहनचालकांना लवकर दिसत नसल्याने अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे खांब रस्त्यातून हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’
रस्ता रुंदीकरण रखडल्यामुळे हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, खडी मशीन चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. रहिवाशांनी केलेली आंदोलने व पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाली होती. मात्र, महावितरणने अद्यापपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारे खांब न हटविल्यामुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’च आहे.

Back to top button