पुणेकरांच्या तोंडचे ‘पाणी’ पळवले! | पुढारी

पुणेकरांच्या तोंडचे ‘पाणी’ पळवले!

पांडुरंग सांडभोर
पुणे : शहराला पुढील वर्षभरासाठी जलसंपदा विभागाने 12.41 टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर केला आहे. तर महापालिकेने वाढीव लोकसंख्येनुसार 20.34 टीएमसी एवढ्या पाणी कोट्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेची मागणी धुडकावून लावून जलसंपदाने पुणेकरांच्या तोंडचे पाणी पळवले असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

दरवर्षी शहराच्या लोकसंख्येनुसार लागणार्‍या पाणीसाठ्याची मागणी महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडे केली जाते. त्यानुसार महापालिकेने 1 जुलै 2022 ते 30 जुन 2023 या कालावधीसाठी आवश्यक पाणी कोट्याचे अंदाजपत्रक गत महिन्यात जलसंपदाला सादर केले होते. त्यात महापालिकेत समाविष्ट गावांसह एकूण 50 लाख लोकसंख्या गृहीत धरून 20.34 टीएमसी पाणी कोटा मंजूर करावा, अशी मागणी केली होती.

मात्र, जलसंपदा विभागाने शहराचा पाणी कोटा निश्चित करताना महापालिकेच्या मागणीला केराची टोपली दाखवत केवळ 12.41 टीएमसी इतकाच कोटा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे गेली सलग पाच वर्षे महापालिकेकडून 20 टीएमसींपेक्षा अधिक पाणी घेतले जात असल्याचे जलसंपदानेच आकडेवारीनुसार दाखवून दिले आहे. त्यामुळे आता मंजूर कोट्यानुसार पाणीपुरवठा सुरू झाल्यास पुणेकरांना कोणत्याही क्षणी पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

वाढीव लोकसंख्येचे पुरावे नाहीत
महापालिकेने वाढीव कोट्यासाठी शहराची लोकसंख्या 50 लाख असल्याचे म्हटले होते. मात्र, पालिकेकडून जी लोकसंख्या दाखविण्यात आली आहे, त्यासाठी आवश्यक असलेले पुरावे सादर केले नाहीत. तसेच महापालिका आयुक्तांनी देखील ते प्रमाणित केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मापदंडानुसार महापालिकेला वर्षभरासाठी 12.41 टीएमसी इतका पाणी कोटा निश्चित होत असल्याचे जलसंपदाने हा पाणी कोटा मंजूर करताना स्पष्ट केले आहे.

76 लाख लोकसंख्येसाठी 14.61 टीएमसी
जलसंपदा विभागाने शहराची 2031ची लोकसंख्या 76 लाख 16 हजार इतकी गृहित धरून त्यानुसार 14.61 टीएमसी इतका पाणीसाठा मंजूर केलेला आहे. या निकषानुसारच चालू वर्षांसाठी सद्य:स्थितीला लोकसंख्येनुसार 12.41 टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर केला आहे.

महापालिकेची होती 20.34 टीएमसीची मागणी

जलसंपदाकडून केवळ 12.41 टीएमसी कोटा मंजूर

Back to top button