पुणे: तुषार हंबीर खुनी हल्ला प्रकरणात वाघमारे टोळीवर मोक्का | पुढारी

पुणे: तुषार हंबीर खुनी हल्ला प्रकरणात वाघमारे टोळीवर मोक्का

पुणे, पुढारी वृत्तसेवा: ससून रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कुख्यात गुंड तुषार हंबीर याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडून खुनी हल्ला करणार्‍या प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे (22, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे) याच्यासह बारा जणांच्या टोळीवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली 97 वी कारवाई आहे तर चालु वर्षातील 34 वी कारवाई आहे.

प्रतिक उर्फ नोन्या संजय वाघमारे (वय 22), सागर हनुमंत ओव्हाळ (वय 22), बालाजी हनुमंत ओव्हाळ (वय 23), सुरज मुक्तार शेख (वय 19), सागर बाळासाहेब आटोळे (वय 21), ऋतीक उर्फ बबलु राजु गायकवाड (वय 19), अनिल अंकुश देवकते (वय 22), गालीब उर्फ समीर मेहबुब आत्तार (वय 19), प्रकाश रणछोड दिवाकार उर्फ समीर मेहबुब आत्तार (वय 19), परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय 21), तम्मा उर्फ रोहित सुरेश धोत्रे (रा. वडार वस्ती) आणि साहिल शेख उर्फ छोटा साहील अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. साहिल शेख हा फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. प्रतिक उर्फ नोन्या वाघमारे टोळी प्रमुख आहे. त्याने व साथीदारांनी तुषार हंबीर याच्यावर ससून रुग्णालायत उपचार असताना आत घुसून हल्ला केला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास करताना वाघमारे हा टोळी एकत्रित करून गुन्हे करत असल्याचे समोर आले.

साडेसातशेहून अधिक गुन्हेगारांवर मोक्का

वाघमारे टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी व त्यांच्या पथकाने तयार करून परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या टोळीवर खूनाचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी पळवून नेणे, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी गुन्हे केले आहेत. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर टोळीवर मोक्का कारवाई केली. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल 97 टोळ्यांवर कारवाई करून साडे सातशेहून अधिक गुन्हेगारांना कारागृहात टाकले आहे.

Back to top button