
यवत; पुढारी वृत्तसेवा: बोरीभडकचे सरपंच श्रीपती गजशिव यांना पदावरून हटविण्यात यावे असा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहे. गजशिव यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्य रेवती पवार यांनी तक्रार दाखल केली होती. उपसरपंच पदाच्या नेमणूकीत टाळाटाळ केल्याच्या ठपका गजशिव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बोरीभडक ग्रामपंचायत निवडणूकीत सन 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. रमेश थोरात गटाचे सरपंच श्रीपती गजशीव हे जनतेतून थेट निवडूण आले होते. तर ग्रामपंचायतमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल गटाचे बहुमत आहे, आणि थोरात गटाचा सरपंच अशी परिस्थीती आहे.
कुल गटाचे सात तर थोरात गटाचे चार सदस्य निवडणूक आले आहेत. कुल गटाचे नेतृत्व करणाऱ्या रेवती पवार व सरपंच गजशिव यांच्यातील कलगीतुरा अनेकदा चव्हाट्य़ावर आला होता. त्यांच्यातील वाद अनेकदा न्यायालयातही गेल्याचे बोलले जाते. कुल गटाची सदस्य संख्या जास्त असल्याने त्यांचा उपसरपंच ठरलेला असायचा त्याप्रमाणे कुल गटाचे जयश्री आतकीरे, विकास आतकीरे, पुनम गव्हाणे, निर्मला कोपऩर, जयश्री कोळपे असे पाच उपसरपंच झाले आहेत. जयश्री कोळपे यांनी दि. 29 जून 2021 रोजी राजीनामा दिल्या नंतर पुढील तीस दिवसांत नव्या (सहाव्या) उपसरपंचांची नेमणूक करण्याचे सोपस्कर पुर्ण होणे अपेक्षित होते.
मात्र थोरात गटाचे चार सदस्य, सरपंच गजशीव आणि तत्कालीन ग्रामसेवक यांनी संगनमताने उपसरपंच पदाच्या निवडीचा निर्णय घेणारी ग्रामपंचायतची सभा होणार नाही यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. असा रेवती पवार यांचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी कायदेशीर लढा सुरू केला. रेवती पवार यांनी केलेल्या तक्रारीची शहनिशा करून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या न्यायालयाने निकाल दिला. या निकालात सरपंच श्रीपती बाबुराव गजशिव यांना सरपंच पदावरून काढून टाकण्यात आल्याचा आदेश दिला आहे.
मागासवर्गीय असल्याने अन्याय: गजशिव
याबाबत प्रतिक्रिया देताना श्रीपती गजशिव म्हणाले, मी मागासवर्गीय असल्याने हा अन्याय होत आहे. मी जनतेतून निवडून आलेला सरपंच आहे. मात्र केवळ मागासवर्गीय असल्याने हा अन्याय होत आहे. रेवती पवार या सदस्या सलग दिड वर्षे ग्रामपंचायत सभेला हजर नाहीत. माझ्यावर त्यांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत. मी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दोनदा दाखल केला आहे. विभागीय आयुक्त यांच्या या निर्णयाविरूद्ध मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. उपसपंच पदाच्या निवडीला आमचा विरोध नव्हता असे सांगितले आहे.
ग्रामसेवक, चार सदस्य ही तितकेच दोषी: रेवती पवार
याबाबत बोलताना रेवती पवार म्हणाल्या की ,या निकालाने आनंद वाटला मात्र पुर्ण समाधान झाले नाही. सरपंचांसोबत तत्कालीन ग्रामसेवक व थोरात गटाचे चारही सदस्या यात तितकेच दोषी आहेत