
पुणे; पुढारी वृत्तसेवा: अनेकदा चालती-बोलती व्यक्ती अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळण्याची उदाहरणे आपलेही हृदय हेलावून टाकतात. तरुण व्यक्तींच्या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक झालेली रक्ताची गुठळी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. ताणतणाव, अतिश्रमामुळे काही वेळा रक्तवाहिन्यांमध्ये चीर जाते व रक्ताची गुठळी तयार होते. थोड्या कालावधीतच ही रक्ताची गुठळी संपूर्ण जागा व्यापून टाकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कुठलीही पूर्वलक्षणे नसल्यामुळे व्यक्ती अचानक कोसळते. म्हणूनच, चांगल्या जीवनशैलीला आजच्या परिस्थितीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पूर्वी पन्नाशीनंतरच्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असायची. गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे 50 टक्के प्रमाण हे 50 वर्षांपेक्षा कमी आणि 25 ते 30 टक्के प्रमाण 40 वर्षांहून कमी वयाच्या पुरुषांमध्ये दिसून येत आहे. बदलती जीवनशैली आणि अतिरिक्त ताणामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. वयाच्या 20 व्या वर्षापासून दर 5 वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासण्याची आवश्यकता डॉक्टरांनी अधोरेखित केली आहे, असे डॉ. मधुसूदन आसावा यांनी सांगितले.
काय आहेत हृदयविकाराची कारणे
बैठी जीवनशैली
अतिरिक्त ताण
चुकीचा आहार
व्यायामाचा अभाव
अपुरी झोप,
मद्यपान
धूम्रपान
स्टिरॉइड्सचा अतिवापर
काय आहेत लक्षणे
थोडेसे चालल्यानंतरही दम लागणे
छातीमध्ये जडपणा वाटणे
घाम येणे
पाठीत आणि छातीत दुखणे
काय घ्यावी काळजी?
आपल्या शारीरिक क्षमतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. अतिव्यायाम किंवा अजिबात हालचाल न
करणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे.
घरगुती अन्नपदार्थ आरोग्यासाठी उत्तम.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, सुका मेवा आदींचा समावेश गरजेचा.
ताणतणावाचे व्यवस्थापन आवश्यक.
कोरोनाचा तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये फुप्फुसांप्रमाणेच हृदयाचीही कार्यक्षमता कमी झाल्याचे दिसून आले. हृदय व फुप्फुस यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे. महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणि डेल्टा व्हेरियंंटच्या प्रादुर्भावादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यास मृत्यूचा धोका 10 पटींनी वाढला. कोविडमधून बरे झाल्यानंतरही हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रमाणात वाढ झाली.
– डॉ. राजन शेट्टी, हृदयरोगतज्ज्ञ
हृदयाशी संबंधित कुठलीही शंका गांभीर्याने घेतली पाहिजे. कारण, त्याचा परिणाम आयुष्यमानावर होऊ शकतो. उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल त्रास असलेल्यांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार वेळेवर औषधे, योग्य आहार व इतर काळजी घ्यावी. ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा वैद्यकीय इतिहास आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. चांगल्या जीवनशैलीचा पर्याय निवडून आपण हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
– डॉ. अभिजित पळशीकर, हृदयरोगतज्ज्ञ