पुणे शहरातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी पालिकेची मंजुरी; 100 कोटी रुपये खर्च | पुढारी

पुणे शहरातील रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी पालिकेची मंजुरी; 100 कोटी रुपये खर्च

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील रस्त्यांची दुरवस्था महापालिका प्रशासनाने मान्य केली असून, रस्तेदुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी या वर्षी 100 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात समान पाणी योजना, ड्रेनेज, खासगी केबल कंपन्या, महावितरण, एमएनजीएलच्या गॅसवाहिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई झाली आहे. अनेक भागांत तर पावसाळ्यातही ही खोदाई करण्यात आली. खोदाईकामानंतर करण्यात आलेली रस्तेदुरुस्ती तकलादू पद्धतीने करण्यात आली.

त्यामुळे पावसाळ्यात शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महापालिकेने 13 ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्यासह 24 अभियंत्यांवर प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या दंडाची कारवाई केली. ठेकेदारांनाही दंड करण्यात आला आहे. मात्र, पालिकेने ही कारवाई केलेली असली तरी पालिकेला रस्त्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. तसेच, जे रस्ते खराब झालेले आहेत. मात्र, अद्याप उखडलेले नाहीत तेसुध्दा दुरुस्त करावे लागणार आहेत. या दुरुस्तीसाठी तब्बल 100 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रस्तादुरुस्तीचे हे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

क्षेत्रीय कार्यालयेही कारवाईच्या रडारवर
क्षेत्रीय कार्यालयांकडून दोष दायित्व कालावधीत रस्त्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र, ही माहिती प्राप्त झाली असून, त्या माहितीच्या आधारे रस्त्यांचे ऑडिट केले जाणार असून, संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सुशोभीकरणाचाही घाट
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या 12 रस्त्यांना व्हीआयपी रस्ता म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती व सुशोभीकरणावर दरवर्षी मोठा खर्च केला जातो. त्यापैकी दुभाजक, दुरुस्त, पेंटिंग, थर्मोप्लास्टिक पेंट, साइन बोर्ड, कब— स्टोन, पेडस्ट्रियन क्रॉसिंग या कामांसाठी निविदा मान्य केल्या आहेत.

Back to top button