कवठे येमाई येथे दुभत्या गायीचा मृत्यू; सर्पदंशाची महिनाभरातील दुसरी घटना | पुढारी

कवठे येमाई येथे दुभत्या गायीचा मृत्यू; सर्पदंशाची महिनाभरातील दुसरी घटना

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील रोहिलवाडीत 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चारा खात असताना घोणस या विषारी सापाच्या दंशाने किसन केरू रोहिले यांची दुभती संकरित गाय दगावली आहे. किसन रोहिले यांचा मुलगा सागर हा नेहमीप्रमाणे चार गायी घेऊन नदी किनारी असलेल्या शेतीनजीक जनावरे चारीत होता. त्यातील एका दुभत्या गायीने अचानक उडी मारली व सुमारे 50 फूट दूर पळत जाऊन जमिनीवर कोसळली. त्या वेळी त्यांना तिथे घोणस दिसून आले.

विषारी सर्पाचा तोंडास दंश झाल्याने त्या गायीचा काही वेळांतच दुर्दैवी मृत्यू झाला. ही गाय दररोज 18 लिटर दूध देणारी होती. सर्पदंशाने मोठी गाय क्षणार्धात दगावल्याने त्यांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे किसन रोहिले यांनी सांगितले.  कवठेच्या तलाठी ललिता वाघमारे यांना घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव शिरूर तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येईल, असे मंडल अधिकारी माधुरी बागले यांनी सांगितले.

मागील दहा दिवसांत कवठे येमाई शिवारात विषारी सर्प चावून गाय मृत्युमुखी पडण्याची ही दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. परिसरात पडत असलेल्या पावसाने मुबलक हिरवा चारा उपलब्ध झाला आहे. सर्पदंशाने रोहिलवाडीत आज गायीचा मृत्यू झाल्याची घटना दुःखदायक आहे. शेतकर्‍यांनी आपली जनावरे नदीकिनारी, शेतानजीक चरावयास नेताना जनावरांची व आपली दक्षता घेणे गरजेचे आहे.
                                                                    – विलासराव रोहिले,
                                                          सामाजिक कार्यकर्ते, कवठे येमाई

Back to top button