पुणे : ग्राम बालविकास केंद्रांत होणार कुपोषित बालकांवर उपचार | पुढारी

पुणे : ग्राम बालविकास केंद्रांत होणार कुपोषित बालकांवर उपचार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालके (सॅम) आणि अतितीव्र कुपोषण बालके (मॅम) या श्रेणीतील 894 बालके आहेत. या बालकांना ग्राम बालविकास केंद्रांमध्ये दाखल करून उपचार आणि पोषण आहार दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात 552 केंद्रे उभारण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

जिल्हा परिषदेकडून कुपोषणमुक्तीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. बारामती तालुक्यातील कार्‍हाटी येथे पहिले ग्राम बालविकास केंद्र मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत सुरू झाले. त्यानंतर कुपोषित श्रेणीमधील बालकांना यामध्ये दाखल करण्यात आले. जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवायोजना ग्रामीण 21 प्रकल्पांतील 532 ग्राम बालविकास केंद्रांमध्ये 116 ‘सॅम’ बालके व 778 ‘मॅम’ बालके असे एकूण 894 बालके आहेत.

कुपोषित बालके कुपोषणमुक्त करण्यासाठी ही ग्राम बालविकास केंद्रे 50 दिवसांकरिता सुरू राहणार आहेत. आहार व अतिरिक्त मानधनासाठी प्रतिबालक 50 दिवसांचे ग्राम बालविकास केंद्राकरिता 2 हजार 155 रुपयांप्रमाणे आगाऊ निधी अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर जमा करण्यात येतो. केंद्राकरिता प्रमाणित केलेली सर्व 7 औषधी ग्राम बालविकास केंद्रामध्ये उपलब्ध करून दिली जातात.

बालकांना मिळणार आहार
ग्राम बालविकास केंद्रामध्ये दाखल होण्यापूर्वी बालकाला घरचा आहार देण्यात येतो. सकाळी 8 वाजता नाचणी खीर, गहूसत्त्व खीर, सकाळी 10 आणि दुपारी 12 वाजता अंगणवाडीतील आहार, दुपारी 2 वाजता मेथी, कोथिंबीर मुठीया, सायंकाळी 4 वाजता केळी, सायंकाळी 6 वाजता मसाला इडली व मुरमुरा लाडू किंवा उतप्पा व मुरमुरा लाडू, रात्री 8 वाजता थालीपीठ अशा प्रकारे बालकाला आहार देण्यात येतो.

                         – जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे

Back to top button