शिक्रापूर येथून बेपत्ता बालिकेचा बापानेच केला खून | पुढारी

शिक्रापूर येथून बेपत्ता बालिकेचा बापानेच केला खून

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: बजरंगवाडी परिसरातील एका सात वर्षे वयाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 27) घडला होता. या मुलीच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असताना आता या घटनेत वेगळेच सत्य सामोरे आले आहे. या मुलीचा जन्मदात्यानेच खून केल्याचे उघड झाले असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले. अपेक्षा युवराज साळुंखे (वय 7, रा. बजरंगवाडी शिक्रापूर, ता. शिरूर) असे खून झालेल्या मुलीचे नाव असून, वडील युवराज साळुंखे (वय 30) याने अपेक्षा हिला वेळ नदीत पाण्यात फेकून ठार मारल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

अनेक सीसी टीव्ही फुटेज तपासल्यानंतर अपेक्षा ही आरोपी-वडिलांबरोबरच दिसून आली. अपेक्षा हिच्या चपलाही मिळण्याच्या काठावर मिळून आल्या आहेत. परंतु, शिक्रापूर पोलिस वेळ नदीच्या पात्रात मृतदेहाचा शोध घेत असून, अद्यापी मृतदेह मिळून आलेला नाही. हा खून कुठल्या कारणासाठी केला, याबाबत अजून आरोपीने माहिती दिलेली नाही. मंगळवारी (दि. 27) सायंकाळच्या सुमारास अपेक्षा ही घरातून जवळच असलेल्या टपरीवर खाऊ आणण्यासाठी गेली होती, परंतु ती घरी परतली नाही.

यानंतर तिच्या आईने अपेक्षा हिचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याबाबतची तक्रार शिक्रापूर पोलीस स्थानकात दिली होती. सध्या लहान मुलांना पळून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा संपूर्ण राज्यात पसरल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर या मुलीचे अपहरण झाल्याने परिसरामध्ये खळबळ पसरली होती. हा गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलीस निरीक्षक शेडगे यांनी आवाहन केले आहे, की सध्या लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी आली आहे, ही अफवा असून, या घटनेचा काहीही संबंध नाही व कुणीही अशा प्रकारच्या अफवा पसरवू नये.

 

Back to top button