खा. सुळे यांची बारामतीतही धावाधाव; नवरात्र मंडळे, मंदिरांना भेटी देत देवदर्शनावर भर | पुढारी

खा. सुळे यांची बारामतीतही धावाधाव; नवरात्र मंडळे, मंदिरांना भेटी देत देवदर्शनावर भर

बारामती; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही तालुक्यात दौरे सुरू केले आहेत. नवरात्रात विविध ठिकाणी त्या हजेरी लावत असून, देवदर्शनावरही त्यांनी भर दिला आहे. सीतारामन यांच्या दौर्‍यामुळे तालुक्यात सुळे यांची सुरू असलेली धावाधाव पाहता त्यांना बारामतीतही अ‍ॅक्टिव्ह व्हावे लागल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

सीतारामन यांच्या दौर्‍यात त्यांनी बारामतीत भाजप कार्यालयाला भेट दिली होती. या वेळी भाजपच्या नेतेमंडळींनी खासदार सुळे यांच्यावर जोरदार टीका केली होती. येथील खासदार तालुक्यात वर्ष-वर्षभर येत नाहीत. कोरोना काळात त्या तालुक्यात फिरकल्या नाहीत. निवडणुकीपुरत्या त्या फिरतात. संसदेत स्वतः नास्तिक असल्याच्या सांगणार्‍या खासदार सध्या प्रत्येक ठिकाणी मंदिरात जाऊन पूजा, आरती करीत आहेत. समाजमाध्यमांवर त्याचे व्हिडीओ, फोटो टाकत असल्याची टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली होती.

सीतारामन यांनीही त्यांच्या दौर्‍यात पवारांची घराणेशाही, काका-पुतण्यांचे राजकारण, बारामती लोकसभा मतदारसंघाचा असमतोल विकास, यांसह केंद्रात सत्तेवर असताना सहकार क्षेत्रासाठी त्यांना काहीच करता आले नसल्याची टीका बारामतीत केली होती. सीतारामन यांच्या पहिल्याच दौर्‍यानंतर बदललेले वातावरण आणि ‘चार्ज’ झालेले भाजपचे कार्यकर्ते, यामुळे राष्ट्रवादीही अ‍ॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे सुळे यांच्या दौर्‍यावरून दिसत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील अकरा गावांचा संपर्क दौरा नुकताच केला. या दौर्‍यात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. विरोधक माझ्यावर टीका करणार, त्यांचा तो अधिकार आहे. परंतु, येथील जनतेला मी कितीदा येते, हे माहीत असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. परंतु, सीतारामन यांच्या दौर्‍यानंतरच सुळे यांचे दौरे वाढल्याचे दिसून येत आहे. त्यांचे हे मॅरेथॉन दौरे अचानक का वाढले, असा प्रश्न आता सामान्यांना पडू लागला आहे.

या संपर्क दौर्‍यात सुळे या गावोगावी मंदिरांत जाऊन दर्शन घेत आहेत. बुधवारी बारामतीतील माळावरची देवी मंदिरातही त्यांनी देवीचे दर्शन घेतले. यापूर्वी असे चित्र अभावानेच दिसत होते. बारामती वगळता अन्य तालुक्यांत त्यांचे सातत्याने दौरे होत होते. परंतु, बारामतीची धुरा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडेच होती. आता सीतारामन यांच्या दौर्‍यानंतर संपर्क दौर्‍यानिमित्ताने त्या गावोगावी भेटी देत आहेत.

 

Back to top button