पुणे : अद्याप नोटिसा मिळाल्या नाहीत; चांदणी चौक परिसरातील स्थानिक अनभिज्ञ | पुढारी

पुणे : अद्याप नोटिसा मिळाल्या नाहीत; चांदणी चौक परिसरातील स्थानिक अनभिज्ञ

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील जुना पूल पाडताना त्या काळात परिसरातील हॉटेलचालक आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात नोटीस पाठवली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नाही, असे हॉटेलचालकांनी सांगितले. त्यामुळे ज्या दिवशी पूल पाडणार त्या दिवशी नेमके काय होणार, याविषयी स्थानिक नागरिक अनभिज्ञ आहेत.

चांदणी चौकातील बहुचर्चित पूल पाडण्याची वेळ निश्चित झाली असून, पूल पाडण्यासाठी सुमारे 600 किलो स्फोटके वापरली जाणार आहेत. त्यामुळे हा स्फोट करताना परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुलाच्या 200 मीटर परिघात तीन हॉटेल आहेत. त्या व्यावसायिकांना कळविले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

हॉटेलचालक बाबा शिंदे म्हणाले, ‘माझे हॉटेल पुलाला लागून असून, अद्याप आम्हाला कुठलीही सूचना मिळालेली नाही. तसेच शेजारी असलेल्या इमारतींशी संबंधित व्यक्तींनाही सूचना अद्याप मिळालेली नाही. प्रसारमाध्यमांतून कळले आहे. हॉटेलच्या सर्व बाजूला काचेच्या मोठ्या खिडक्या आहेत. तसेच, सर्व सोसायटींच्या इमारतींनाही काचेच्याच खिडक्या आहेत.’ ‘त्यामुळे प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्याबरोबरच स्थानिक नागरिकांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात बैठक घेऊन मार्गदर्शन करावे,’ अशी मागणी शिंदे यांनी केली आहेे.

 

Back to top button