पुणे : आशासेविकांची निम्मी पदे रिक्त; पालिकेच्या आरोग्य विभागातील चित्र | पुढारी

पुणे : आशासेविकांची निम्मी पदे रिक्त; पालिकेच्या आरोग्य विभागातील चित्र

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आशासेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध योजनांची अंमलबजावणी, त्यासाठी सर्वेक्षण करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. मात्र, सध्या 595 जागांपैकी सध्या केवळ 293 जागा भरलेल्या आहेत, तर निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांची स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी वस्त्यांमध्ये फिरून माहिती संकलित करण्याचे महत्त्वाचे काम आशासेविकांकडून केले जाते.

किमान दहावी उत्तीर्ण, वस्तीपातळीवर काम करण्याचा अनुभव, समाजकार्याची आवड आणि वय 45 वर्षांपेक्षा कमी असलेल्या महिलांना आशासेविका म्हणून प्राधान्य देण्यात येते. त्यांना 14 प्रकारच्या कामांचे प्रशिक्षण दिले जाते. आशासेविकांची नियमानुसार नियुक्ती व्हावी आणि सर्व योजनांचे उद्दिष्ट पूर्ण व्हावे, यादृष्टीने लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी दिली. आशासेविकांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार मानधन दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button