पंचनामा आदेश नसल्याने आंबेगावच्या उत्तर भागातील शेतकरी त्रस्त | पुढारी

पंचनामा आदेश नसल्याने आंबेगावच्या उत्तर भागातील शेतकरी त्रस्त

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात मागील आठवड्यात पावसाने पिकांचे नुकसान केले. मात्र, कृषी विभागाने तहसीलदार कार्यालयाच्या आदेशानुसार फक्त चांडोली बुद्रुक येथील पंचनामे सुरू केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्वरित पंचनामे करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा टाकेवाडीचे उपसरपंच राष्ट्रवादीचे अनिल चिखले यांनी दिला आहे. नांदुर, महाळुंगे, साकोरे, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, गिरवली, चास, नारोडी, वडगाव काशिंबेग आदी गावांमध्ये मागील आठवड्यात मुसळधार पावसाने अतोनात नुकसान झाले. मात्र, फक्त चांडोली बुद्रुक येथील पंचनामे सुरू केले आहेत, अन्य गावांतील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मागील महिन्यातही काही भागांत मुसळधार तर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने महाळुंगे पडवळ येथील स्मशानभूमी वाहून गेली. सैदवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा पाझर तलाव पायातून उखडला, तर विकासवाडी येथे डोंगराचे पाणी रस्त्यावर आल्याने डांबरी रस्त्यावर खड्डे पडले. साकोरे येथील दशरथ विठ्ठल मोडवे यांचा ऊस भुईसपाट झाला. दिलीप आवटे यांच्या शेताचे बांध फुटल्याने अतोनात नुकसान झाले. बाळासाहेब डोके यांच्या शेतातून पाणी वाहून गेल्याने जमीन नापीक झाली. गाडेपट्टी येथील बळीराम म्हातारबा गाडे यांच्या शेतातील डिंभे डावा कालव्याची उपचारी फुटल्याने जमीन खरडून गेली आहे.

साकोरेतील स्मशानभूमीचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले, तर चास येथील फुलशेती, पालेभाजी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिपावसाने गोगलगायींचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. फ्लॉवर, कोबी, बीट आदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. सुमारे दीड हजार हेक्टर सोयाबीन पीक पाण्यात राहिल्याने पिवळे पडले आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.

पिकांचा पंचनामा करणे गरजेचे असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. पण, महसूल विभागाच्या आदेशानुसार चांडोली बुद्रुक येथील शेतकर्‍यांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती कळवली आहे. कळंब परिसरात मोठे नुकसान होऊनही पंचनामे का नाहीत, असा प्रश्न शेतकरी प्रशासनाकडे करीत आहेत. योग्य कारवाई त्वरित न झाल्यास माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

चांडोलीत ढगफुटी झाल्यानेच पंचनामे : कृषी विभाग
चांडोली परिसरातील पर्जन्यमापकात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची नोंद मिळाल्याने तेथील पंचनामे सुरू केल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने दिली आहे. टाकेवाडी, विठ्ठलवाडी, महाळुंगे पडवळ, साकोरे, चास या गावांचे मंडल कार्यालय घोडेगाव असल्याने घोडेगाव येथील पर्जन्यमापकात कमी पावसाची नोंद दिसत असल्याने पंचनाम्याचे आदेश नाहीत, असेही घोडेगाव कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

अद्याप लेखी आदेश नाही
आम्हाला अद्याप कोणताही लेखी आदेश नसल्याने पंचनाम्याबाबत निर्णय घेता येत नाही. बाधित शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

                                            – अश्विनी गोरे, गाव कामगार तलाठी, महाळुंगे पडवळ

Back to top button