शेतमजुराच्या मुलाला 21 लाखांचे पॅकेज; हॉस्टेलला राहून शिक्षण केले पूर्ण | पुढारी

शेतमजुराच्या मुलाला 21 लाखांचे पॅकेज; हॉस्टेलला राहून शिक्षण केले पूर्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आपण करीत असलेल्या प्रयत्नांना जर प्रामाणिकपणाची जोड मिळाली, तर निश्चितच ध्येय साध्य होऊन समाजासमोर एक आदर्श ठेवला जाऊ शकतो आणि तो आदर्श निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरू शकतो, अशीच प्रेरणादायी भरारी किरण केळगंद्रे या विद्यार्थ्याने घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतमजूर असलेल्या आई-वडिलांचे स्वप्न उराशी घेऊन समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्‍या किरणला त्याच्या परिश्रमाच्या जोरावर सॅमसंगसारख्या नामवंत कंपनीत 21 लाख रुपयांचे पॅकेज असलेल्या नोकरीची ऑफर मिळाली आहे.

वैजापूर तालुक्यातील पानवी गावात किरणने त्याचे 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृह या योजनेत पुणे येथील शासकीय वसतिगृहात निवड झाली आणि त्याचा प्रवास येथून सुरू झाला. शासकीय वसतिगृहात राहून किरणने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. वसतिगृहाचे गृहपाल संतोष जैन यांचा त्याच्या यशात फार मोठा सिंहाचा वाट आहे, असे तो सांगतो.
किरण केळगंद्रे याचा समाजकल्याण विभागाच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. याबरोबरच आणखी दोन विद्यार्थ्यांना देखील विविध कंपन्यांमध्ये अनुक्रमे 14 आणि 15 लाखांचे पॅकेज मिळाले आहे.

Back to top button