पुणे : प्रश्न सोडवण्याऐवजी टाकला जातोय दबाव; स्पर्धा परीक्षार्थींची भावना | पुढारी

पुणे : प्रश्न सोडवण्याऐवजी टाकला जातोय दबाव; स्पर्धा परीक्षार्थींची भावना

गणेश खळदकर
पुणे : ‘स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न समजून घेणारी यंत्रणा उभारावी लागणार आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास विविध समस्या निर्माण होणार असून, त्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल,’ अशी भावना स्पर्धा परीक्षार्थींकडून व्यक्त होत आहे.

स्पर्धा परीक्षा देणार्‍या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही हजार जणांनाच परीक्षेत यश मिळते. साहजिकच अपयश पदरी पडलेले काही विद्यार्थी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येत आहे. तर काही तरुण विद्रोहाचा मार्ग पत्करतील.

उच्च शिक्षण घेऊनही, सलग अभ्यास करूनही सनदी सेवेतील नोकरी न मिळालेल्या युवकांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होईल आणि मग त्यांच्या नैराश्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे याची खबरदारी शासनाला घ्यावी लागणार असून स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचे आव्हान शासनासमोर निर्माण झाले आहे.

  • मागण्यांची दखल घेण्याची एमपीएससी स्टुडंट राईट्स संघटनेची मागणी
    एमपीएससी स्टुडंट राईट्स संघटना गेल्या अनेक वर्षांपासून काही मागण्या शासनाकडे करत आहे, त्याची दखल घेण्याची मागणी संबंधित संघटनेने केली आहे.
  • एमपीएससीमध्ये रिक्त असणार्‍या सदस्यांची नियुक्ती करावी.
  • 2018 मध्ये एमपीएससी मुख्यालयाबाबत निर्णय झाला असून, काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेली प्रक्रिया पूर्ण करून मुख्यालयाच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करावी.
  • 2018 अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी 50 कोटी निधींची तरतूद करण्यात आली होती, परंतु त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला तर ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी शहरांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. यातून ग्रामीण भागातील मुलेदेखील त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांची नोकरी किंवा व्यवसाय करून उर्वरित वेळेत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतील.
  • मुख्य परीक्षा किंवा मुलाखतीतून बाहेर पडलेल्या उमेदवारांसाठी खासगी नोकरीत संधी देणे गरजेचे आहे. तसेच अशा परीक्षार्थींसाठी सीएम फेलोशिपसारखी काही योजना राबवता येईल का, याचादेखील विचार होणे गरजेचे आहे.

आयोगाचे दबावतंत्र कमी व्हावे…
स्पर्धा परीक्षार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलने करतात किंवा आयोगाला विविध समस्यांबाबत जाब विचारतात. परंतु अलीकडील काळात आयोग संबंधित विद्यार्थ्यांवर दबाव टाकत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षार्थींना परीक्षेला बसण्यास अटकाव करणे, कारवाई करण्याचा इशारा देणे अशा आयोगाच्या दबावामुळे परीक्षार्थींमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे आयोगाने दबावतंत्राचा वापर करू नये, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

स्पर्धा परीक्षार्थींना शासनाने सनदी नोकरीसंदर्भात पारदर्शक माहिती देणे गरजेचे आहे. सनदी नोकरीव्यतिरिक्त स्पर्धा परीक्षार्थी काय करू शकतात, याची माहिती देणारी यंत्रणा शासनाला उभी करावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षार्थींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शासनाला चालणार नाही.
                          – डॉ. अरुण अडसूळ, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Back to top button