
पुणे, पुढारी वृत्तसेवा: प्रियकर-प्रेयसीचे अपहरण करून कुडजे गावच्या जंगलात नेऊन तिघांनी बेल्ट, दगड, लाकडी बांबू, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. परवानगी शिवाय बहीणीला घरी भेटायला आला म्हणून तरुणीचा भाऊ व त्याच्या मित्राने ही मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजता जाधवनगर वडगाव बुद्रुक व कुडजे गावच्या पुढील जंगल परिसरात घडली. याप्रकरणी, सिंहगड रोड पोलिसांनी प्रेयसी तरुणीचा भाऊ व त्याचा मित्र अशा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. याबाबत एका 20 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि आरोपीची बहीण या दोघांत प्रेमसंबंध आहेत. फिर्यादी हा जाधवनगर वडगाव येथील प्रेयसी तरुणीच्या घरी रात्रीच्यावेळी भेटायला गेला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांच्या परवानगी शिवाय तो प्रेयसीला भेटायला आल्याचा त्यांना राग आला. त्यातूनच तिघांनी घराच्या दरवाज्यावर लाथामारून आत प्रवेश केला. त्यानंतर दोघांना जबरदस्तीने रिक्षात बसवून रात्रीच्यावेळी कुडजे गावच्या पुढील जंगलात घेऊन गेले. तेथे दोघांना बेल्ट, दगड व लाकडी बांबूने मारहाण करून शिवीगाळ केली.
आमच्या बहिणीला परत भेटायला आला तर परत सोडणार नाही, अशी तरुणाला आरोपींनी धमकी दिली. त्यानंतर तरुणाला तेथेच सोडून आरोपी परत आले होते. हा प्रकार घडल्यानंतर तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेत होणार्या पत्नीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेल्यानंतर तिचा भाऊ व मित्रांनी जबरदस्तीने दोघांना रिक्षात घेऊन जाऊन मारहाण केल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निकम करत आहेत.