पुणे: डेक्कन परिसरात लॉन्ड्री चालकाचा खून; नदी पात्रात फेकला मृतदेह | पुढारी

पुणे: डेक्कन परिसरात लॉन्ड्री चालकाचा खून; नदी पात्रात फेकला मृतदेह

पुणे, पुढारी वृत्तसेवा: डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नदीपात्रात खून करून तरूणाचा मृतदेह टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गणेश सुरेश कदम (35, रा. शनिवारपेठ, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत अवस्थेत पडलेल्या तरूणाच्या गळ्यावर धारदार हत्यारांनी वार करून त्याचा खून केल्याचे दिसून आले.

आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास हा मृतदेह आढळला. त्याच्याकडील तपासणीत त्याचे नाव गणेश कदम असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अधिक माहीती काढली असता तो लॉन्ड्री चालक असून, त्याची शनिवार पेठेत लाँड्री असल्याचे समोर आले आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याला फोन आल्यानंतर तो घराबाहेर पडला होता. परंतु त्याचा शोध घेऊनही तो त्याच्या घरच्यांना सापडला नाही. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका सर्व्हिस सेंटर चालकाने नदीपात्रात झेडब्रीज जवळच एक मृतदेह पडला असल्याची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या या निघृण खुनाच्या प्रकारामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गुन्ह्याचा पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

Back to top button