पुणे: हडपसरमध्ये रिक्षा चालकाचा निघृण खून

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सकाळी झालेल्या बाचाबाची नंतर रिक्षा चालक तरूणाला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन दगडाने तसेच बांबुने मारहाण करत त्याचा निघृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर- माळवाडी येथील केशव चौकाजवळील नारळाच्या बागेजवळ घडला. सागर राहुल गायकवाड (24, रा. लक्ष्मी माता मंदीर, गुरूदत्त मेडीकलच्या मागे, हडपसर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अक्षदा प्रतिक वाघमारे (22, रा. शांतीनगर वसाहत, बनकर कॉनली, आकाशवाणी समोर, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा विठ्ठल रेखले (27, रा. कवडीगाव टोल नाका, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर गायकवाड आणि संशयीत आरोपी कृष्णा रेखले हे दोघेही रिक्षा चालक आहेत. रविवारी सकाळी दोघांची लोणी काळभोर येथील कवडीपाट टोलनाक्या जवळ बाचाबाची झाली होती. त्यानंतर रेखले याने सागरला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलवून घेऊन लाकडी बांबुने तसेच दगडाने तोंडावर मारून त्याला जखमी करत त्याचा खुन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई, गुन्हे निरीक्षक दिगंबर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान गुन्हा करणार्‍या संशयीत आरोपी रेखले याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version