पुणे : अल्पवयीन मुलाचा भरदिवसा खून | पुढारी

पुणे : अल्पवयीन मुलाचा भरदिवसा खून

पुणे / धायरी; पुढारी वृत्तसेवा: सिंहगडरोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथे मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाचा डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घालून खून करण्यात आला आहे. नागेश सायबाण्णा चिंचोळे (वय 17, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि.25) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथे घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नागेश हा वडगाव बुद्रुक येथील पाऊंजाई मंदिरापाठीमागील घुलेनगर परिसरात असणार्‍या मोकळ्या प्लॉटमध्ये एका मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान, त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेश याच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घातली. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्रेम प्रकरणातून हा खून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड पोलिस करत आहेत.

Back to top button