पिंपरी : बजाज कंपनीला पाठवले खोटे ‘समन्स’ | पुढारी

पिंपरी : बजाज कंपनीला पाठवले खोटे ‘समन्स’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या नावे बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीला खोटे समन्स पाठवल्याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 ते 29 ऑगस्ट या कालावधीत निगडी येथील बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीत उघडकीस आला. याप्रकरणी बजाज ऑटो लिमिटेड कंपनीचे लीगल मॅनेजर उमेश वासुदेव भंगाळे (36, रा. मोशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 23) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रभाकर विठ्ठलराव मानकर (रा. औरंगाबाद) याच्यासह इतर काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यासह कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना औरंगाबाद येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) यांचे समन्स प्राप्त झाले. यामध्ये 6 सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याच्या सूचना होत्या. समन्सच्या पत्रावर न्यायालयाचे सील, शिक्का आणि सहायक अधीक्षक मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, औरंगाबाद यांची स्वाक्षरी होती. दरम्यान, या समन्सचा तपशील तपासण्यासाठीफिर्यादी यांनी न्यायालयाच्या संकेतस्थळावर चौकशी केली; तसेच न्यायालयाकडे पत्रव्यवहार करून खात्री केली.

मात्र, अशा प्रकारचे कोणतेही समन्स बजाज ऑटो कंपनीला पाठविण्यात आले नसल्याचे समोर आले होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता आरोपींनी खोटी सही आणि बारकोडचा वापर करून खोटे समन्स पाठवले. तसेच, स्वतःच्या हस्ताक्षरात धमकीचा मजकूर लिहून कंपनी व पदाधिकार्‍यांकडून बेकायदा देशीरपणे पैसे उकळण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे फिर्याद नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास निगडी पोलिस करत आहेत.

Back to top button